डॉ. अमोल अन्नदाते
सध्या अनेक कंपन्यांचे हँड सॅनिटायझर उपलब्ध आहेत. तसेच जाहिरातींतून ९९.९ टक्के हातावरील विषाणू व जीवाणू नष्ट करत असल्याचे दावे केले जात आहेत. पण इतक्या अचुकतेने असे दावे करणे चुकीचे आहे. कुठलेही सॅनिटायझर ९९ टक्के विषाणू, जीवाणू नष्ट करेल, हे खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. यासाठी साबणाने हात धुणे याला पर्याय नाही व हँड सॅनिटायझर ही केवळ एक लग्झरी आहे.सांगण्याचे तात्पर्य, साबणाने हात धुण्याची जागा हँड सॅनिटायझर घेऊ शकत नाही. पण पाण्याची उपलब्धता व बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नसल्यास हँड सॅनिटायझर चांगला पर्याय ठरतो. बाजारात उपलब्ध असलेल्यांपैकी चांगला हँड सॅनिटायझर कुठला, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे.
अल्कोहोल हा हँड सॅनिटायझरचा मुख्य घटक असतो. पण कुठले व किती टक्के अल्कोहोल वापरले आहे, यावरून हँड सॅनिटायझरची उपयुक्तता सिद्ध होते. साधारण ३ ते ४ प्रकारचे व टक्केवारीमध्ये अल्कोहोल वापरले जाते. प्रोपेनेलॉल, डी नेचर्ड अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, आयसो प्रोपील अल्कोहोल हे ते चार प्रकारचे अल्कोहोल असतात.
या चारही अल्कोहोलची परिणामकारकता वरील क्रमानुसारच जास्त ते कमी अशी असते. यात ७५ % प्रोपेनेलॉल असलेले सर्वाधिक परिणामकारक असते. हे कोरोना विषाणूसाठीच नव्हे तर इतर सर्व विषाणू,जीवाणूला निर्बंध करण्यास उपयोगी पडते. ज्या हँड सॅनिटायझरमध्ये प्रोपेनेलॉलसोबत मेसेट्रोनियम इथिल सल्फेट असते, त्याची परिणामकारकता सर्वाधिक वेळ म्हणजे ३ ते ५ तास टिकून राहते.
सर्वात परिणामकारक हँड सॅनिटायझर वापरला तरी त्याचा परिणाम ४ ते ६ तासच राहतो. सध्या उपलब्ध असलेल्या जेल आणि पातळ हँड सॅनिटायझरपैकी पातळ हँड सॅनिटायझर जास्त परिणामकारक असतो. कारण तो हातांच्या सूक्ष्म भेगांपर्यंत पोहोचू शकतो. जेलच्या स्वरूपातला मात्र त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर बनून राहतो. अनेकांना जास्त हँड सॅनीटायझरच्या वापरामुळे जास्त झोप येणे / गुंगी आल्यासारखे वाटणे हा त्रास होतो आहे. त्यातच डॉक्टरांना सध्या हँड सॅनिटायझर जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यासाठी हातावर हँड सॅनिटायझर घेताना एका बाजूला म्हणजे सॅनिटायझरसमोर चेहरा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)