इंग्लंडने (England) कोरोनावरील यशस्वी उपचारांसाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या वापराला सशर्त परवानगी दिली आहे. ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल हे अद्याप स्पष्ट नसले, तरी ही गोळी उपचारासाठी उपयुक्त असल्याचे मानणारा इंग्लंड हा पहिलाच देत आहे. 18 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या उपचारासाठी या गोळीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Anti Corona Pill Molnupiravir)
'मोल्नुपिराविर' असे या औषधाचे नाव आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असलेल्या व्यक्तींना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल. ही अँटीव्हायरल गोळी कोरोनाची लक्षणे कमी करते आणि रुग्णास लवकर बरे होण्यास मदत करते. ही गोळी रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
अमेरिका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित नियामक या गोळीची समीक्षा करत आहेत. ही गोळी किती सुरक्षित आहे आणि किती परिणामकारक आहे, यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी नोव्हेंबर अखेरीस पॅनेलची बैठक बोलावण्यात येईल, असे यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या महिन्यातच म्हटले होते.
इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरमध्येच घोषणा केली होती, की 'मोल्नुपिराविर'चे 480,000 डोस मिळाले आहेत आणि थंडीच्या काळात या गोळ्यांची हजारो लोकांवर उपचारासाठी मदत होईल, अशी आशा आहे. इंग्लंडचे आरोग्यमंत्री साजिद जावीद म्हणाले, 'आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण इंग्लंड हा जगातील असा पहिलाच देश आहे, ज्याने अशा औषधाला मंजुरी दिली आहे, की जे घरच्या घरीच कोरोनावरील उपचारासाठी घेतले जाऊ शकते.