गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनानं लाखो लोकांचा जीव घेतला असून अद्यापही या महामारीचं संकट कायम आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी वैज्ञानिकांनी रात्रदिवस मेहनत घेत कोरोना लसीचं संशोधन केले. जगातील बहुतांश देशात कोरोनाच्या विविध लसी लोकांना दिल्या जात आहेत. मात्र कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे प्रत्येक देशासमोर मोठं आव्हान उभं राहत आहे.
कोरोनाच्या या महामारीत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यूएस एफडीएनं फायझरच्या पॅक्सलोविड गोळीला मान्यता दिली आहे. आता १२ वर्ष आणि त्यावरील अतिजोखीम असलेल्या व्यक्तींना कोरोना उपचारावेळी पॅक्सलोविड टॅब्लेट दिली जाणार आहे. अद्याप भारतात ही उपलब्ध होण्याची वाट पाहावी लागेल. कोरोनावरील हे पहिलेच औषध आहे जे संक्रमित रुग्ण हॉस्पिटलमध्ये न जाता घरीच ते घेऊ शकतात. कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत फायझरची पॅक्सलोविड टॅब्लेटचा वापर करु शकतात.
ही गोळी कोरोनाविरुद्ध लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. लाखो रुग्णांसाठी त्यामुळे दिलासा मिळणार आहे. अमेरिकेने पॅक्सलोविड नावाच्या टॅब्लेटचा शोध घेत कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांचा मृत्यूचा धोका टळणार असल्याचा दावा केला आहे. एफडीए वैज्ञानिक पैट्रिजिया कैवाजोनी यांनी सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या या लढाईत हे ऐतिहासिक पाऊल आहे. कोरोनावर उपचारासाठी ही टॅब्लेट यशस्वी ठरली आहे.
फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष अल्बर्ट बोरुला म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार करणाऱ्या २२०० रुग्णांवर या टॅब्लेटचं परिक्षण करण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. या टॅबलेटच्या वापरामुळे मृत्यूचा धोका ८८ टक्के कमी केला जावू शकतो असं समोर आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट अलीकडेच समोर आला आहे. त्यामुळे कंपनीने ओमायक्रॉन रुग्णावर याची चाचणी केली नाही. परंतु ही टॅब्लेट अँन्टिबॉडी आणि लसीपेक्षा वेगळं काम करते. त्यामुळे ओमायक्रॉनच नव्हे तर कोरोनाच्या कुठल्याही व्हेरिएंटवर प्रभावी ठरु शकते असं तज्ज्ञांनी सांगितले.
पॅक्सलोविड गोळीपासून धोका नाही
अमेरिकेच्या औषध नियंत्रक समितीसमोर पॅक्सलोविड टॅबलेटचा अर्ज पोहचला होता. समितीच्या सर्व सदस्यांनी याच्या वापरासाठी परवानगी दिली. या गोळीच्या वापराबाबत सुरक्षासंबंधी कुठलाही धोका दिसला नाही.