नवी दिल्ली - लठ्ठ, तुलनेने कमी तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. (Coronavirus in India) मात्र आता शरीरात जमा झालेली चरबी ही कोरोनावरील उपचारांत अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. ज्या लोकांच्या कंबर आणि पोटावर चरबी साठलेली असते, अशा लठ्ठ लोकांवर उपचार करताना अनेक समस्या निर्माण होतात, त्यांची प्रकृती सुधारण्यास वेळ लागतो आणि त्यांना हाय व्हेंटिलेशन प्रेशरची गरजही भासते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. (Waist and belly fat can become a barrier to corona recovery)
डॉक्टरांनी सांगितले की, असे तरुण ज्यांच्या कंबरेचा घेर गेल्या एका वर्षामध्ये चरबी साठल्यामुळे वाढला आहे. त्यांनाही कुठल्याही लठ्ठ व्यक्तीएवढाच धोका उद्भवू शकतो. त्यामुळे असे लोक ज्यांचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच शरीराचा द्रव्यमान सुचकांक जरी चांगला असला आणि त्यांच्या कंबरेवर चरबी असेल तर अशा लोकांच्या तुलनेत सडपातळ बांध्याचे लोक कोरोनामधून लवकर मुक्त होऊ शकतात. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने लोकांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, ज्यामुळे ते कोरोनाच्या गंभीर परिणामांचा सामना करू शकतील, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गंभीर रुग्णांवरील उपचारातील तज्ज्ञ असलेले डॉ. नूर मोहम्मद यांनी सांगितेल की, पोटाच्या दबावामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. पोट आणि छातीवर चरबी साठल्याने फुप्फुसे आकुंचन पावतात आणि त्यांचे व्यवस्थित प्रसरण होत नाही. लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांना दीर्घकाळासाठी बायपेप आणि व्हेंटिलेटरची गजर भासू शकते. जर पोटावर चरबी नसेल तर असा रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढते.
किंग्सवे रुग्णालयाचे कोविड इन्चार्ज डॉ. हर्षवर्धन बोरा यांच्या म्हणण्यानुसार तरुणांमध्ये लठ्ठपणा पहिल्या लाटेदरम्यानसुद्धाही तेवढाच धोकादायक होता. कारण तेव्हा बहुतांश काळ लोक घरामध्येच राहीले. त्यामुळे लोकांचे वजन वाढले. त्यात कुठलाही व्यायाम न करणे हे अधिकच धोकादायक ठरले. लठ्ठ लोक उपचारांना लवक प्रतिसाद देत नाहीत. एवढेच नाही या लोकांमधील स्लिप एप्नियामुळे ऑक्सिजनची पातळीही कमी राहते.
तर सेनगुप्ता रुग्णालयाच्या डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी सांगितले की, जर तुम्ही कोरोनावरील लस घेतली असेल आणि तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर तुम्हाला रुग्णालयात जाण्याचा धोका कमी असेल.