अमेरिकेतील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या शनिवारी चीनवर आरोप लावले होते की, चीनने कोरोना व्हायरससंबधी डेटा लपवला आहे आणि तो त्यांनी जगातल्या इतर देशांसोबत शेअर करावा. कोरोना व्हायरस संक्रमणासंबंधी आता अशा रूग्णांची माहिती मिळाली आहे जे की, 'सायलेंट कॅरिअर' आहेत. असा दावा केला जात आहे की, जगभरात कोरोना यांच्यामुळेच पसरला.
कोण आहेत सायलेंट कॅरिअर?
(Image Credit : marketwatch.com)
साउथ चायना मॉर्निगं पोस्टच्या हाती चीन सरकारचे काही कोरोना संबंधित गुप्त कागदपत्रे लागली आहेत. ज्यात सायलेंट कॅरिअरचा उल्लेख केला गेला आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना कोरोनाची लागण तर झाली पण त्यांच्यात लक्षणे दिसली नाहीत किंवा बऱ्याच उशीरा दिसत आहेत. ज्यामुळे हे लोक त्यांच्या आजूबाजूला कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. या कागदपत्रांनुसार, चीन आणि जगात समोर आलेल्या एकूण पीडितांच्या संख्येपैकी यांची संख्या एक तृतीयांश आहे.
चीनमध्ये अधिक सापडले
या कागदपत्रांनुसार, चीनमध्ये फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत 43 हजारांपेक्षा जास्त अशा केसेस नोंदवण्यात आल्या होत्या. ज्यांना कोरोनाची लागण झाल्याची कोणतीच प्राथमिक लक्षणे दिसली नव्हती. या लोकांना क्वारेंटाईन ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचारही करण्यात आले होते. पण त्यांना चीनने संक्रमित लोकांच्या यादीत टाकलं नव्हतं.
चीनच्या वैज्ञानिकांमध्ये याबाबत मतभेद होते की, ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत ते खरंच कोरोना पसरवत आहेत की नाही. सामान्य लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे पाच दिवसात बघायला मिळतात. पण या लोकांमध्ये तीन आठवड्यानंतर लक्षणे दिसली. ती सुद्धा फार कमी.
WHO चं काय मत आहे?
WHO ने याबाबत स्पष्ट गाइडलाईन जारी केली आहे. त्यानुसार, लक्षणे दिसत नसली तरी त्या रूग्णांना कोरोनाची लागण झालेल्यांच्या यादीत ठेवलं जाईल. पण चीन सरकारने याला न जुमानता फेब्रुवारीमध्ये क्लासिफिकेशन गाइडलाईन्स बदलल्या. आणि केवळ लक्षणे दिसणाऱ्या लोकांनाच कोरोना संक्रमित मानलं. दरम्यान चीनने कोरोना संक्रमितांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची टेस्ट अनिवार्य केली होती. त्यामुळे या व्हायरसवर कंट्रोल मिळवण्यास त्यांना मदत झाली.
(Image Credit : scmp.com)
म्हणजे WHO ने सुद्धा लक्षणे न दिसणाऱ्या कोरोनाने संक्रमित केसेस असल्याचं स्वीकारलं आहे. पण WHO नुसार, अशा केसेस 1 ते 3 टक्केच आहेत. जपानच्या वैज्ञानिकांच्या एक ग्रुपचे नेतृत्व होकाइडो युनिव्हर्सिटीचे एपिडेमोलॉजी डिपार्टमेंटचे मुख्य हिरोशी निशिउरा हे करत होते. त्यांनीही हा दावा केला की, चीनने जेवढ्या कोरोना संक्रमणच्या केसेस आणि मृत्यूंचा दावा केला तो खरा नाही वाटत. चीनचा डेटा काळजीपूर्वक पाहिल तर त्यात अनेक त्रुटी दिसून येतात.