नवी दिल्ली : चीन आणि अमेरिकेत पुन्हा कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रादुर्भाव दिसून येत आहे. चीन आणि अमेरिकेत कोरोना संसर्गाची (Covid 19 Infection) झपाट्याने वाढ होत असलेल्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कोरोनाच्या परिस्थितीबाबत दर आठवड्याला आरोग्य मंत्रालयात आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या ताज्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांच्या तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल (Dr VK Paul) यांनी भाष्य केले.
घाबरण्याची गरज नाही आहे. गर्दीत लोकांना मास्क लावण्याची सल्ला दिला जातो. पुरेशा प्रमाणात टेस्टिंग केली जात आहे, असे व्हीके पॉल म्हणाले. तसेच, यादरम्यान आरोग्य मंत्रालय पुढील काळात काय पावले उचलायची याचा निर्णय घेईल, असे व्हीके पॉल यांनी सांगितले. आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर व्हीके पॉल म्हणाले की, कोरोना अजून संपलेला नाही, पण कोरोनापासून घाबरण्याची गरज नाही. चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत, परंतु आम्ही कोरोनाबाबत सावध आहोत. आजच्या बैठकीत चीनच्या नवीन कोरोना व्हेरिएंटवरही चर्चा झाली. देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला प्रिकॉशन डोस मिळायला हवा. प्रत्येकाने प्रिकॉशन डोस घेणे बंधनकारक आहे.
दरम्यान, व्ही के पॉल यांच्यावतीने लोकांना सल्ला देण्यात आला की, खोकला आणि सर्दी झाल्यास टेस्ट करून घ्यावी. तसेच, आवश्यक वाटेल तेव्हा टेस्टिंग करावी. प्रिकॉशन डोस (Covid 19 Precaution Dose) आतापर्यंत फक्त 27 टक्के लोकांनी घेतला आहे, ज्यांनी घेतला नाही, त्यांनी डोस घ्यावा. सध्या कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. सर्व्हिलान्स सिस्टम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अंतर्गत, भारतातील सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गंभीर निमोनियाच्या प्रकरणांचा मागोवा घेतला जाईल, असे व्ही के पॉल यांनी सांगितले.
याचबरोबर, लोकांना सल्ला देताना व्हीके पॉल म्हणाले की, गर्दीत मास्क घालावे लागेल आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांची काळजी घ्यावी लागेल. ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. वयोवृद्ध लोकांची सर्वाधिक काळजी घ्या. मास्क अनिवार्य आहे. आवश्यक असल्यास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली जाईल. कोरोना संदर्भात सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.