मुंबई: देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम आहे. देशात दररोज जवळपास दीड लाखच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. लसीकरण अभियान सुरू असल्यानं तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होती. रुग्ण संख्या वाढली, तरीही मृत्यूंची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी होती. आता शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
घरांमध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या तेरड्याच्या माध्यमातून कोरोनाला रोखलं जाऊ शकतं, असं संशोधन सांगतं. कोरोनामुळे शरीराला येणारी सूज रोखण्यातही तेरडा प्रभावी आहे. कोरोनाच्या स्वस्त आणि सुरक्षित उपचारांसाठी यावर आणखी संशोधन व्हायला हवं, असं संशोधकांनी सांगितलं. एँटीऑक्सिडंट्स जर्नलमध्ये याबद्दलचं संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
तेरड्याच्या रोपट्यात असणारं कार्नोसिक ऍसिड कंपाऊंड-१९ स्पाईक प्रोटिन आणि रिसेप्टर प्रोटिन ACE2 यांच्यातील परस्पर क्रिया रोखू शकतं. कोविड-१९ विषाणू स्पाईक प्रोटिनचा वापर कोशिकांना संक्रमित करण्यासाठी करतो. कार्नोसिक ऍसिड आणि अन्य काही संयुगं कोविड १९ आणि अन्य काही आजारांविरोधात स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी रुपानं काम करू शकतात. त्यामुळे यावर आणखी संशोधन व्हायला हवं, असं प्राध्यापक आणि वरिष्ठ लेखक स्टुअर्ट लिप्टन यांनी सांगितलं.
तेरड्यामध्ये कार्नोसिक ऍसिड असतं. त्यात औषधी गुण भरपूर असतात. त्यामुळे याचा उपयोग अनेक औषधांमध्ये आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये केला जातो. कार्नोसिक ऍसिड सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. स्मृतीभ्रंशासारखी लक्षणं कमी करण्यातही कार्नोसिक ऍसिड परिणामकारक ठरतं.