नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Coronavirus)साथीच्या आजारातून बरे झाल्यानंतर पाच लोकांना पित्ताशयामध्ये (Gallbladder) गॅंगरिनच्या (Gangrene) समस्येचा सामना करावा लागला. मात्र, पाचही रुग्णांचे पित्ताशय लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले आहे. या पाच रुग्णांवर जून ते ऑगस्ट दरम्यान सर गंगा राम रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. (after recovering covid-19 people are getting gangrene problem in gallbladder know what is gangrene disease)
इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पॅन्क्रेटीकोबिलरी सायन्सचे अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा म्हणाले, "आम्ही जून ते ऑगस्ट दरम्यान अशा पाच रुग्णांवर यशस्वी उपचार केले. कोविड -19 मधून बरे झाल्यानंतर या रुग्णांच्या पित्ताशयात गंभीर सूज आली होती. ज्यामुळे पित्ताशयात गॅंगरिनची समस्या निर्माण झाली. अशा परिस्थितीत त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक असते." याचबरोबर, डॉ. अनिल अरोरा यांनी दावा केला की, कोविड -19 संसर्गातून बरे झाल्यानंतर पित्ताशयामध्ये गॅंगरिनची प्रकरणे नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पाच रुग्णांपैकी, चार पुरुष आणि एक महिला आहेत, ज्यांचे वय 37 ते 75 वर्षे यादरम्यान आहे.
गॅंगरिन हा एक आजार आहे. ज्यामध्ये शरीराच्या काही भागातील ऊती नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे तिथे जखमा सतत पसरतात. सर्व रुग्णांनी ताप, ओटीपोटावरील उजव्या बाजूला वेदना आणि उलट्या झाल्याची तक्रार केली होती. त्यापैकी दोघांना मधुमेह आणि एकाला हृदयरोग होता. या रुग्णांनी कोविड -19 च्या उपचारांमध्ये स्टेरॉइड घेतले होते. तसेच, कोविड - 19 साथीची लक्षणे आणि पित्ताशयातील गॅंगरिन रोग शोधण्याच्या कालावधीमध्ये दोन महिन्यांचे अंतर होते. पोटाचा अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनद्वारे हा रोग आढळून आला. डॉ. अनिल अरोरा यांनी सांगितले की, सर्व रुग्णांवर लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया झाली आणि पित्ताशय काढण्यात आले.
(कोरोना बाधित प्रत्येक पाचवा रुग्ण मानसिक समस्यांनी ग्रस्त, डॉक्टरांनाही झाला त्रास)
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे काय?लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे दुर्बिणीच्या साहाय्याने ओटीपोटामध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया. लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. शरीरावर मोठे छेद न करता केवळ दोन ते तीन छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. हे छेद एक ते तीन सेंटिमीटरचे असतात. लेप्रोस्कोप हा एक लांब आणि पातळ नलिकेसारखा असतो. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि उच्च-रिझोल्युशन असलेला कॅमेरा असतो. पोटावर लहान छेद घेऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घातली जातात. या साधनांच्या आणि पोटातील अवयवांच्या प्रतिमा कॅमेराद्वारे व्हिडिओ मॉनिटरवर दिसतात. लॅपरोस्कोपीमुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरातील अवयवांची खुली शस्त्रक्रिया न करताही प्रत्यक्ष तपासणी करता येते. या प्रक्रियेदरम्यान आपल्या डॉक्टरांना बायोप्सी (पुढील तपासणीसाठी) नमुने देखील घेता येतात.
लॅप्रोस्कोपी का केली जाते?लॅप्रोस्कोपी बहुतेक वेळा पोटातील किंवा ओटीपोटातील वेदनांचा स्रोत ओळखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी वापरली जाते. नॉन-इन्व्हेसिव्ह पद्धती जेव्हा निदान करण्यास अक्षम असतात तेव्हा सहसा लॅप्रोस्कोपी केली जाते.
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कधी केली जाते?जगभरात सध्या रुग्णावर उपचार करण्यासाठी लॅप्रोस्कोपीक तंत्राचा वापर केला जातो. लॅप्रोस्कोपीक प्रक्रियेद्वारे आता बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, हायटस हर्निया, इनगिनल हर्निया, हेपेटोबिलरी, स्वादुपिंडाचा आजार, स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. याशिवाय कोलोरेक्टल कॅन्सर, जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर यांसारख्या इतर अवयवांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पटकन आराम मिळू शकतो. परंतु, प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचा आढावा घेऊन लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया करावी का याबाबत डॉक्टर ठरवतात.
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कशी केली जाते?लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया ही सामान्य भूल देऊन केली जाते. या पोटाला 3 ते 4 सेंटिमीटरचा छेद केला जातो. त्यानंतर ओटीपोटीत गॅस पंप करण्यासाठी वापरण्यात येणारी ट्यूब टाकली जाते. याशिवाय कॅमेरा मार्फत ओटीपोटीतील दृश्य पाहण्यास डॉक्टरांना मदत मिळते.