कोरोना आल्यापासून देशोदेशीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधण्यास सुरुवात केली होती. त्यात प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन आणि भारताला मोठे यश लाभले होते. या तीन देशांनी लसी तयार केल्या होत्या. रशिया, चीनने देखील लस तयार केली होती परंतू ती तेवढी विश्वासार्ह नव्हती. आता एका कंपनीने कोरोनावर गोळ्यारुपी औषध शोधले आहे. (Molnupiravir antiviral pill developed by US company Merck.)
महत्वाचे म्हणजे ही अँटीव्हारल पिल असून हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची आणि मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करत असल्याचे वैद्यकीय चाचणीमध्ये समोर आले आहे. अमेरिकन कंपनी मर्क अँड रिजबॅक बायोथेरापिटीक्सने ही गोळी विकसित केली आहे. याचे नाव मॉल्नूपिरावीर (Molnupiravir) असे ठेवण्यात आले आहे. ही गोळी सध्याच्या सर्वात घातक अशा डेल्टा व्हेरिअंटवर देखील प्रभावी ठरल्याचे द हिलच्या बातमीमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेमध्ये या गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळावी म्हणून लवकरच FDA कडे अर्ज करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. जर या गोळीला मान्यता मिळाली तर कोरोनावरील जगातील पहिले तोंडावाटे घेतले जाणारे औषध ठरणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये ही गोळी घेतलेल्या 7.3 टक्के रुग्णांना 29 दिवसांनी हॉस्पिटलाईज करावे लागले.
या गोळीचे अमेरिका, युरोप, जपान, साऊथ आफ्रिका, तैवान सारख्या देशांतील 170 शहरांमध्ये चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या गोळ्या घेतलेल्या रुग्णांपैकी 14 टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे, लठ्ठ, मधुमेही, हृदय विकार असलेल्या रुग्णांवरही या गोळीची चाचणी घेण्यात आली आहे.