कोरोनाचा कहर दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. हेट्रो लॅब्स कंपनीने कोविफोर म्हणजेच रेमडिसिव्हिर या औषधाचा पुरवठा भारतात करायला सुरूवात केली आहे. यात महाराष्ट्र, हैदराबाद, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. यानंतरच्या टप्प्यात म्हणजेच पुढच्या आठवड्यात या औषधाचा पुरवठा कोलकाता, भुवनेश्वर, रांची, विजयवाडा, कोचीन, त्रिवेंद्रम आणि गोवा या ठिकाणांना करण्यात येणार आहे.
कोरोना संक्रमणामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना रेमडिसिव्हिर आता देता येईल. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावरील उपचारांत रेमडिसिव्हिर सामील केल्याने हे रुग्ण लवकर बरे होण्यास मोठी मदत मिळणार आहे.कोविफॉर हे औषध १०० मिलिग्रॅम इंजेक्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. या औषधासाठी हेट्रो कंपनीने अमेरिकेच्या गिलियड सायन्सेस या कंपनीसोबत करार केला आहे.
DCGI ने रेमडिसिव्हिर तयार करण्यासाठी सिप्ला आणि हेट्रो हेल्थकेअर या कंपन्यांना परवानगी दिली आहे. या औषधांचा वापर आपातकालीन स्थितीत केला जातो. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार हेट्रो हेल्थकेअरचे प्रमुख एम श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले की, भारतात कोविफोर औषधाच्या वापरास परवागनी देणं हे आवाहानात्मक आहे. कोविड19 च्या वाढत्या प्रकारांमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. कोविफोर हे पहिले जेनेरिक औषध तयार केले जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या औषधांचा वापर गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती केलेल्या रुग्णांसाठी केला जाणार आहे.
कोविड 19 च्या उपचारांसाठी आतापर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात होता. कोविड-19 वर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १६,९२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ४१९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार लाख ७३ हजारांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत १४८९४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक! एमएमआर लसीने कोरोनाच्या संक्रमणापासून राहता येईल दूर; वाचा तज्ज्ञांचं मत
सावधान! जास्त वेळ एकाच जागी बसल्याने वाढत आहे कॅन्सरचा धोका; जाणून घ्या रिसर्च