लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणानंतर आता राज्यातील कोरोना प्रतिबंधक मोहिमेचा वेग कमालीचा मंदावला आहे. त्यामुळे खासगी आणि शासकीय-पालिका क्षेत्रात सर्वत्र लसीकरणाविषयी निराशेचे वातावरण आहे, अशा स्थितीत राज्यातील सहा लाख कोविशिल्ड लसीचा साठा ऑगस्ट महिन्यात मुदतबाह्य होत आहेत. त्यामुळे या साठ्याचे विनियोग कऱण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे.
केंद्र शासनाने कोविड अमृत लस महोत्सव जाहीर केल्यानंतर विनामूल्य बूस्टर डोस मोहिमेला सुरुवात झाली. यामुळे लसीकऱणाविषयीचे चित्र पुन्हा काहीसे बदलले म्हणजेच ही मोहीम सुरू झाल्यापासून राज्यात १५ जुलैपासून दर दिवशी साधारण दोन लाख लाभार्थ्यांनी बूस्टर घेतला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसपर्यंत लाभार्थ्यांचा अशा प्रकारचा उत्साह व सकारात्मकता न राहिल्यास मोठ्या प्रमाणात लस साठा वाया जाण्याचा धोका असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात अजूनही दुसरी लस मात्रा घेण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या अधिक आहे, याविषयी राज्याचे लसीकऱण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले, विनामूल्य मोहिमेला मिळणारा लाभार्थ्यांचा प्रतिसाद महिनाअखेरीसपर्यंत टिकून राहिला पाहिजे, त्यामुळे लस साठा वाया जाण्याचा धोका कमी होईल. शिवाय, मुदतबाह्य होणारा लस साठा वापरला जाईल. या पुढील महिन्यात सप्टेंबरमध्येही एक लाख ७३ हजार लस मात्रा मुदतबाह्य होणार आहेत. त्यामुळे जिल्हापातळीपासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत सर्व यंत्रणांना बूस्टर मोहीम अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून, मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी बूस्टर मोहिमेला प्रतिसाद द्यावा. राज्याने बूस्टरच्या विनामूल्य मोहिमेसाठी पाच लाख कोविशिल्ड लससाठा मागविला होता, त्यातील तीन लाख लस मात्रा आलेल्या असून, दोन लाख शिल्लक आहेत. कोव्हॅक्सिन लस मात्रांचा साठा हा डिसेंबरअखेरीस मुदतबाह्य होणार आहे, तर कोर्बोव्हॅक्सचा लस साठा पुढील वर्षी सुरुवातीला मुदतबाह्य होईल. त्यामुळे या लसींच्या साठ्याविषयी चिंता नाही. अधिकाधिक लाभार्थ्यांनी बूस्टर मोहिमेचा लाभ घेऊन कोरोना संरक्षण मिळवावे.