लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होण्यासाठी राज्यामध्ये प्रथमच धोरण जाहीर करण्यात आले आहे.
अवयवदात्याचा उचित सन्मान व्हावा याकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अवयवदात्यांची ‘मेमरी वॉल’ तयार करणार करण्यात येणार आहे. तसेच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याचे ज्ञान मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांना मिळावे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाची मान्यता घेऊन एक वर्षाचा क्रिटिकल केअर विषयातील पदव्युत्तर फेलोशिप कोर्स सुरू करणार आहे. राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही.
याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.
धोरणात काय? सर्व मेडिकल कॉलेजमध्ये क्रिटिकल केअर विभाग स्थापन करून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून त्याकरिता वैद्यकीय आयोगाच्या निकषांचे पालन करणार. ज्या ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे शक्य नाही, त्या ठिकाणी एक वर्षाची या विषयातील फेलोशिप सुरू करणार
२५ वैद्यकीय महाविद्यालयांकरिता ५० ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर पद निर्माण करणार, महिन्याकाठी ठोक मानधन ३५ हजार रुपये देणार अवयवदात्याचा रुग्णालयाचा खर्च रुग्णालय स्तरावर करण्यात यावा, तसेच मृतदेहासोबत घरी जाण्याकरिता अवयवदात्याच्या कुटुंबीयाला वाहनाचा खर्च झेटसीसीमार्फत उपलब्ध करून देणार. अवयवदात्याच्या नातेवाइकाची राहण्याची व्यवस्था नजीकच्या शासकीय विश्रामगृहात करणार
प्रजासत्ताक दिनी शासकीय समारंभात अवयदात्याच्या कुटुंबीयांचा सत्कार करणार मुंबई शहराकरिता उतीपेशी केंद्र जे. जे. रुग्णालयात उभारणार
सात मेडिकल कॉलेजमध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्र उभारणार, १६५ कोटी खर्च करणार अवयवदात्याचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार
सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये (एनटीओआरसी) पुनर्प्राप्ती केंद्र निर्माण करणार