काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या स्टॅन्फोर्ड यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की, मनुष्याचा निरोगी जीवन जगण्याचा कालावधी आधीच्या तुलनेत वाढला आहे आणि आता येणारी पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा ३ वर्ष जास्त जीवन जगत आहेत. या अभ्यासासाठी अभ्यासकांनी गेल्या ५० वर्षातील माहितीचं विश्लेषण केलं. त्यात अभ्यासकांना असे आढळले की, जे लोक ६५ वर्षांपर्यंत जिवंत राहतात ते त्यांच्या आई-वडिलांच्या तुलनेत जास्त जीवन जगतात.
मात्र, लाइफ एक्सपेक्टेंसी म्हणजेच जिवंत राहण्याचा काळ वाढणे याचा अर्थ लोक निरोगी जीवन जगत आहेत, असा होत नाही. लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार २०१७ मधील एका डेटामध्ये असे आढळले की, आरोग्याबाबत जगभरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता वाढून सुद्धा लोकांच्या आरोग्यात फार जास्त सुधारणा झालेली बघायला मिळत नाही. याचं स्पष्टीकरण पुढील आकडेवारीवरुन लक्षात घेता येईल. म्हणजे २०१७ मध्ये ग्लोबल लाइफ एक्सपेक्टेंसी ७३ वर्ष इतकी होती. यातील निरोगी जीवन जगण्याचा कालावधी हा ६३ वर्ष होता. म्हणजे लोकांचं १० वर्षांचं आयुष्य खराब किंवा वेगवेगळ्या आजारांनी वेढलेलं होतं.
१९९० च्या तुलनेत २०१७ मध्ये लोकांच्या निरोगी जीवन जगण्याच्या कालावधीमध्ये ६ वर्ष ३ महिन्यांची वाढ झाली. २०१७ मध्ये हेल्थ लाइफ एक्सपेक्टेंसीच्या बाबतीत सिंगापूर हा देश पहिल्या क्रमांकावर होता. तर मध्य आफ्रिका रिपब्लिक शेवटच्या क्रमांकावर होता. १९९० ते २०१७ दरम्यान communicable म्हणजेच स्पर्शाने पसरणारे रोग आणि नवजात बाळांच्या संबंधित आजारांची प्रकरणे ४१ टक्क्यांनी कमी झाली आहेत. तर non-communicable म्हणजेच स्पर्शाने न होणाऱ्या आजारांमध्ये ४० टक्के वाढ झालेली बघायला मिळाली. वाढ झालेली ही आकडेवारी चिंताजनक आहे.
भारतीय लोकसंख्येचा विचार करायचा तर १९९० च्या तुलनेत २०१७ मध्ये भारतातील लोक चांगल्या आरोग्यासोबत १० वर्ष जास्त जगत होते. १९९० मध्ये महिलांचा निरोगी जीवनकाळ हा ५० वर्ष होता, तो आता २०१७ मध्ये वाढून ५९ वर्ष झाला आहे. आणि पुरुषांचं सांगायचं तर १९९० मध्ये पुरुषांची हेल्दी लाइफ एक्सपेक्टेंसी म्हणजेच निरोगी जीवनकाळ ५१ वर्ष होता. तो आता २०१७ मध्ये वाढून ५९ वर्ष झाला आहे.
ही आकडेवारी हेच सांगते की, जरी लोकांचा जीवन जगण्याचा कालावधी वाढला असेल, पण त्यांच्यांत वेगवेगळ्या आजारांचंही प्रमाण वाढलं आहे. अनेकजण फार कमी आयुष्य निरोगी जगत आहेत. महत्त्वाची बाब म्हणेज आरोग्याबाबत इतकी जागरुकता असूनही लोक आरोग्याकडे फार गांभिर्याने बघतातच असे दिसत नाही.