शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी किडनीचे फार महत्त्व असते. किडनी म्हणजे शरीरातील फिल्टर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु, जेव्हा किडनीचे आरोग्य खराब होते त्यावेळी अनेक रूग्णांचा डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. अशातच डायलिसिसच्या रूग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना शक्यतो अशाच पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो, ज्या पदार्थांमुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होणार नाहीत आणि ते आर्टिफिशिअल पद्धतीने बाहेरही काढता येतील.
काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, फळं आणि भाज्यांचे जास्त सेवन केल्याने डायलिसिसच्या रूग्णांच्या अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. ज्या रूग्णांची किडनी फेल होते, त्यांना अशाप्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असते. कारण या पदार्थांमुळे शरीरामध्ये पोटॅशिअम लेव्हलही वाढते. तसेच या संशोधनातून असं सिद्ध करण्यात आलं आहे की, फळं आणि भाज्यांचे जास्त सेवन केल्याने या रूग्णांना होणारा हृदयरोगाचा धोका कमी होतो परिणामी मृत्यूदरही कमी होतो.
या संशोधनासाठी संशोधकांनी डायलिसिसच्या 8,078 रूग्णांचं निरिक्षण केलं. अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या क्लिनिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ज्या रूग्णांनी प्रत्येक आठवड्यामध्ये फळं आणि भाज्यांच्या कॉम्बिनेशनच्या 10 सर्विंग्स खाल्या त्यांच्यामध्ये कोणत्याही इतर कारणांपेक्षा मृत्यूचा धोका 10 टक्क्यांनी कमी होता. तसेच हृदयाशी संबंधित कारणांशिवाय मृत्यू होणाऱ्यांमध्ये हा धोका 12 टक्क्यांनी कमी होता.
याव्यतिरिक्त 10 पेक्षा अधिक सर्विंग्स खाणाऱ्या लोकांमध्ये कोणत्याही कारणाने मृत्यूचा धोका 20 टक्क्यांनी कमी आणि हृदयाशी संबंधित कारणांशिवाय मृत्यू होणाऱ्यांमध्ये हा धोका 23 टक्क्यांनी कमी होतो. यूनिवर्सिटी ऑफ सिडनीचे असोसिएट प्रोफेसर जर्मेन वोंग यांनी सांगितले की, 'या निष्कर्षांमुळे असं समजतं की, शरीरामधील मुबलक पोटॅशिअम कमी करण्यासाठी डायलिसिसच्या रूग्णांना जास्त फळं आणि भाज्या खाण्यापासून रोखण्यात येत असेल तर त्यामुळे त्यांना यातून मिळणाऱ्या पोषक तत्वांपासून वंचित ठेवण्यात येतं.' दरम्यान हेमोडायलिसिसच्या रूग्णांना फळं आणि भाज्यांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं.