धुळे : दरवर्षी पावसाळयात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरत असल्याने मनपा प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागते़ मात्र यंदा पावसाळयापुर्वी महापालिका आरोग्य विभागाकडून डेग्यू डासांची तपासणी व जनजागृती केली जात आहे़ मात्र शहरात अद्याप एकही रूग्ण न आढळल्याने मनपाला मोठा दिलासा मिळाला आहे़डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे़ एडिस इजिप्टाय प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गीत मादिच्या चावण्यामुळे ह्या आजाराची लागण होत असते़ दोन वर्षापुर्वीशहरात डेंग्यूचे ५० रूग्ण आढळले होते, ज्यापैकी ३ रूग्णांचा मृत्यू झाला होता़ या आजाराच्या लक्षणांमध्ये तीव्र ताप, डोके दुखी, उलटी, अंगदुखी, डोळयाच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात़ यंदा पावसाळा सुरू होण्यापुर्वी आरोग्य विभागातर्फे शहरात डेंग्यूची तपासणी व जनजागृती केली जात आहे़ मात्र उद्याप डेंग्यूचा एकही रूग्ण निष्पन्न झालेला नाही़ त्यातच उपाययोजना प्रभावी करण्यासाठी मलेरिया विभागाचे कर्मचारी वाढविण्यात आले आहे़ त्यामुळे कर्मचारी संख्याही वाढली आहे़