साबणाचा अतिवापर घातक !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2016 4:17 PM
आज प्रत्येक जण शरीराच्या स्वच्छतेसाठी साबण, शाम्पू, टुथपेस्टचा वापर करतो. मात्र, अमेरिकी विद्यापीठाच्या नवीन संशोधनानुसार वरील वस्तूंचा अतिवापर केल्यास कर्करोग होऊ शकतो.
आज प्रत्येक जण शरीराच्या स्वच्छतेसाठी साबण, शाम्पू, टुथपेस्टचा वापर करतो. मात्र, अमेरिकी विद्यापीठाच्या नवीन संशोधनानुसार वरील वस्तूंचा अतिवापर केल्यास कर्करोग होऊ शकतो. संशोधनात कर्करोगाला कारणीभूत ठरणारा ट्राइक्लोजन हा घटक साबणात आढळून आला असून, साबणाचा अतिवापर घातक ठरणार आहे. यामुळे कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो औषध विभागाने आपल्या नवीन संशोधनाच्या अहवालानुसार सर्वांनाच साबणाचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले आहे. प्राध्यापक रॉबर्ट एच. दुकी यांनी सांगितल्याप्रमाणे, कर्करोग आणि यकृताच्या रोगाला कारणीभूत असलेला ट्राइक्लोजन घटक साबणात आढळून आला आहे. या घटकाचा प्रयोगशाळेत उंदरावर प्रयोग करण्यात आला असता त्याला यकृत बिघाड आणि कर्करोग झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे उंदरांवर वाईट परिणाम करणारा ट्राइक्लोजन मानवावर तेवढाच वाईट परिणाम करू शकतो, असा दावा प्राध्यापकांनी केला आहे. उंदरांवर सहा महिने ट्राइक्लोजनचा प्रयोग केला असता त्यांच्यात कर्करोगाची लक्षणे दिसून आली. ट्राइक्लोजन हा एक रोग प्रतिकारक घटक असला तरी याचा अतिवापर घातक ठरु शकतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले.