मुंबई : शरीरातील विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिजैविकांना विशेष महत्त्व आहे. अनेकदा घरातील दैनंदिन वापराच्या साबण किंवा फ्लोअर क्लीनर्समध्येही याचा वापर केला जातो. जोपर्यंत प्रतिजैविके जीवाणूसाठी प्रतिरोधक म्हणून काम करत असतात, तोपर्यंत त्यांचा परिणाम औषध म्हणून परिणामकारक ठरत असतो. मात्र, प्रतिजैविक या स्रोतांमधून वातावरणात प्रवेश करतात आणि आपले अन्न आणि पाणी दूषित करतात.
शरीरात थोडे-थोडे जाणारे हे प्रतिजैविके शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात, शिवाय शरीराला किंवा विषाणूंना प्रतिजैविकांची सवय झाल्यास ते प्रतिरोधक म्हणून काम करण्यास असमर्थ ठरत असल्याने, आपण मांस, डेअरी पदार्थ आणि पिण्याच्या पाण्यातील प्रतिजैविकांची क्षमता कमी असेल, याची काळजी घ्यायला हवी. आयआयटी बॉम्बे आणि मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या काही संशोधकांनी अशा सेन्सॉरची निर्मिती केली आहे, जे कुठल्याही खाण्या-पिण्याच्या गोष्टींमधील प्रतिजैविकांची पातळी मोजू शकणार आहे.
जी औषधे आजाराचा प्रादुर्भाव झाल्यावर आजार बरा करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यातून घेतली जातात, त्याला प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) म्हणतात. प्रतिजैविके प्रामुख्याने जीवाणूजन्य आजारांवर प्रभावी असतात. या प्रतिजैविकांचा अन्नपदार्थातील स्तर मोजण्यासाठीच आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सौम्या मुखर्जी यांनी संशोधित केलेले सेन्सर हे वापरण्यासाठी सोपे, सहज, किफायतशीर आणि विश्वासाहार्य आहे. या सेन्सरच्या माध्यमातून बी-लॅक्टम प्रकारच्या प्रतिजैविकांची चाचणी करणेही शक्य होणार आहे. हे संशोधन नुकतेच ॲनॅलेटिकल केमिस्ट्री या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सध्या आपल्याकडे अँटिबायोटिक्सचे नमुने घेण्याची पद्धती उपलब्ध आहे. मात्र, त्याची पातळी मोजण्याचे कोणतेही साधन नाही. यामुळे मुखर्जी यांच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.
सेन्सरच्या पेटंटसाठी अर्जपेनिसिलीन आणि याच प्रकारच्या इतर प्रतिजैविकांचा समावेश बी-लॅक्टममध्ये होतो. एखाद्या यू पिनपेक्षाही लहान आकाराच्या असणाऱ्या यू आकाराच्या सेन्सरला पॉलिएनीलिनचे कव्हर आहे जे सॅम्पलमध्ये बुडवून चाचणी केली जाऊ शकते. जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल, तेव्हा सेन्सरची किंमत ३० ते ३५ रुपयांपेक्षा कमी असू शकते, अशी अपेक्षा संशोधकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संशोधकांनी सेन्सरच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे आणि पेटंट मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती दिली आहे.