साखर, रक्तदाब किंवा वजनवाढीचा प्रश्न सोडवायचा असेल तर निरोगी जीवनशैलीसाठी योगसाधनेला पर्याय नाही. व्यायामाने तन-मन हलके होते, तजेला मिळतो, उत्साह वाढतो आणि राग-रोग दूर होतात. मात्र आपण नेमका त्याचाच आळस करतो. परंतु डॉक्टर भोपकर सांगतात, व्यायाम प्रत्येकाने केलाच पाहिजे, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी ठराविक योगासने केली असता त्याचा त्यांना निश्चितच लाभ होतो. यासंदर्भात लोकांना सर्वसामान्यपणे पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत.
१ . मधुमेहासाठी मी दररोज योगासने करावीत का?
मधुमेह नियंत्रणात ठेवण्याच्या प्रवासात दररोज योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. मात्र त्यासाठी सगळी योगासने उपयोगाची नाही, काही ठराविक आसनेही योग्य परिणाम साधू शकतील. त्याबद्दल पुढे माहिती दिली आहे.
२. गुडघेदुखीसह मी योगा करू शकतो का?
जर तुम्हाला गुडघेदुखी होत असेल तर गुडघ्यांवर दबाव आणणारी योगासने टाळा. त्यामुळे योगासने नीट जमणार नाही आणि ती चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे तसेच गुडघ्यावर दाब आल्याने गुडघेदुखीत भर पडेल.
३. योगा करण्यासाठी प्रशिक्षकाची गरज आहे का?
योगासनांचा सराव असल्यास तुम्ही आपणहून योगप्रकार करू शकता, मात्र तुम्ही नवशिके असाल तर योगप्रशिक्षकांशिवाय योगसाधना करू नका. कारण योग हा केवळ हातापायांचा व इतर अवयवांचा ताळमेळ नाही तर श्वसनाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. ते योग्य प्रकारे झाले तरच योगसाधनेचा लाभ होतो.
मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणाऱ्या सोप्प्या योगासनांची यादी आणि त्यांचे महत्त्व. ही योगासने नियमितपणे केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना फार मदत होते. जास्त मेहनत न घेता करता येणारी ही आसने आहेत.
१.कपालभाती प्राणायाम
कपालभाती प्राणायाम आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या मज्जातंतूंना ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे प्राणायाम महत्त्वाचे आहे कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. पचन संस्था सक्रिय होते. साखर नियंत्रणात राहते. या प्राणायामने मनाला शांती मिळते.
२. सुप्त मत्स्येन्द्रसन
सुप्त मत्सेंद्रयासन अन्न पचन करण्यास मदत करते. हे आसन मधुमेह रूग्णांसाठी खूप चांगले आहे.
३. धनुरासन
या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरते.
४. पश्चिमोत्तानासन
हे आसन ओटीपोटातील अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पश्चिमोत्तानासन शरीरातील महत्वाची उर्जा वाढवते आणि मनाला शांती प्रदान करते.
५. अर्ध मत्स्येंद्रासन
हे आसन ओटीपोटाच्या अवयवांची मालिश करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. अर्ध मत्स्येंद्रासन मणक्याला देखील बळकट करते. हे योग आसन केल्याने मन शांत होते.
६. शवासन
शवासन संपूर्ण शरीराला विश्रांती देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत नेते, ज्यामुळे मन शांत होते आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते.