मधुमेह हा असा आजार आहे जो कधीच पूर्ण बरा होऊ शकत नाही. मात्र याला उपचाराने आणि औषधांनी नियंत्रणात आणता येते. निरोगी आयुष्य, पोषक आहार, व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. मात्र मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडु शकते. ज्यांना मधुमेह होतो त्यांचे ब्लड शुगर जास्त वाढते. यासाठी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर अनेक वेळा अवयव कापण्याचीही वेळ येऊ शकते. एवढेच नाही तर एक व्यक्ती कोमात जाता जाता वाचला आहे.
दुबईत राहणारे ४७ वर्षांचे पाकिस्तानी व्यक्ती मोहम्मद रजाक यांची डायबिटिस लेव्हल इतकी वाढली की त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करावे लागले. त्यांना चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे अशा समस्या येऊ लागल्या. तपासणीनंतर धक्कादायक आकडेवारी निदर्शनास आली. त्यांच्या ब्लड शुगरची रेंज ७३० पर्यंत पोहचली. नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल ८० ते १४० च्या रेंजमध्ये हवी. अशात रजाक यांची लेव्हल ५ पटींनी वाढली होती. डॉक्टरांनी सांगितले औषधे बंद केल्याने, पोषक आहार न घेतल्याने त्यांची ब्लड शुगर लेव्हल इतकी जास्त वाढली. आणखी उशीर झाला असता तर ते कोमात गेले असते.
कोणती चुक पडली महागात ?
डायबिटिस नियंत्रणात आल्यानंतर रजाक यांनी औषधे घेणे बंद केले.तसेच शुगर लेव्हल तपासणेही थांबवले. एक दिवस जेवण झाल्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. चक्कर आली. यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डायबिटिजमुळे या समस्या येऊ शकतात
डॉक्टरांनी सांगितले, डायबिटिज लेव्हल नियंत्रणात ठेवली नाही तर आंधळेपणा, नर्व्ह डॅमेज, आणि किडनी फेल सारख्या समस्या येऊ शकतात. रजाक यांचे नशिब चांगले होते की ब्लड शुगर लेव्हल ५ पटींनी वाढून सुद्धा त्यांना कोणतेही साईड इफेक्ट झाले नाहीत.