- मयूर पठाडे
‘परफेक्ट फिगर!’ - हा काय प्रकार असतो? कारण जगात कोणाचीही फिगर परफेक्ट नाही. मग तरीही तरुण पिढी, विशेषत: तरुणी त्याच्यासाठी का एवढय़ा वेड्यापिशा झाल्या आहेत?
या परफेक्ट फिगरसाठी आणि साहजिकच त्यासाठी वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाचाच आटापिटा सुरू असतो. त्यासाठी मग सार्याच भल्याबुर्या मार्गांचा वापर केला जातो. व्यायामानं वजन नाही कमी होत किंवा (पुरेसा) व्यायाम करायची तयारी नाही, ‘वेळच मिळत नाही’ हे कारण नेहमीच ओठावर तयार आहे, कंटाळा मनावर आणि शरीरावर राक्षसासारखा बसलेला आहे, पण स्लिम ट्रिम तर व्हायचंय, मग काय करायचं?
त्यासाठी अनेक जण सोप्पा उपाय अवलंबतात. वजन कमी करण्यासाठीच्या गोळ्या घ्यायच्या आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं. हा आजकाल ट्रेंडच झाला आहे. एक अभ्यास असं सांगतो, तरुणाईत, त्यातही तरुणींमध्ये या डाएट पिल्स घेण्याचं प्रमाण जवळपास दुपटीनं वाढलं आहे.
पण परफेक्ट फिगरसाठी अशा सोप्प्या उपायांच्या मागे धावणार्यांना शास्त्रज्ञांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे, वजन कमी करण्यासाठी, आकर्षक फिगरच्या हव्यासापोटी तुम्ही जर डाएट पिल्सचा वापर करीत असाल, तर ताबडतोब हे प्रकार थांबवा, नाहीतर आफत येईल. लेने के देने पड जाएंगे.
डाएट पिल्सपासून काय होतो धोका?
1- कोणत्याही वयोगटासाठी डाएट पिल्स अत्यंत घातक आहेत. कारण त्यात विषारी, घातक रासायनिक पदार्थ असतात.
2- या गोळ्या तुमच्या शरीरावरच आक्रमण करतात आणि तुमच्या शरीराचा ताबा घेतात.
3- या गोळ्यांमुळे शरीरात न्युट्रिशनल डेफिशिअन्सीज तयार होतात.
4- आपल्या शरीरातील लोह आणि कॅशियम नष्ट करण्याचं काम या गोळ्या करतात.
5- आपल्या शरीरातील एनर्जी लेव्हल त्यामुळे कमी होते.
6- वाढत्या वयातील मुलं जर अशा डाएट पिल्स जर घेत असतील तर त्यांच्या संपूर्ण वाढीवरच त्याचा अत्यंत वाईट आणि दुरगामी परिणाम होतो.
7- हार्ट रेट वाढणं, चक्कर येणं, जखम झाल्यावर रक्त लवकर न थांबणं, हार्ट अटॅक आणि या गोळ्यांमुळे अगदी मृत्यूदेखील येऊ शकतो.
वजन घटवण्याचे काय आहेत मार्ग?
वजन कमी करण्याची आणि परफेक्ट फिगर ठेवण्याची इच्छा काही वाईट नाही. पण त्यासाठीचे आपले मार्ग बरोबर आहेत का ते आधी तपासून पाहा. त्यासाठी घरच्याघरीदेखील काही सोपे उपाय करून पाहाता येतील.
1- व्यायामाला कोणत्याही परिस्थितीत पर्याय नाही.
2- पण व्यायाम जर आत्ता अगदी शक्यच नसेल, तर भरपूर पाणी प्या.
3- मेडिटेशन करा.
40 एकाच वेळी आणि एकदम खाण्याच्याऐवजी आपला आहार तेवढाच ठेऊन तो दिवसाच्या विविध वेळी विभागून घ्या.
5- रात्रीचा आहार कमी करा.
6- फास्टफूड आणि अरबट चरबट खाण्यावर, येताजाता काहीबाही तोंडात टाकण्यावर निर्बंध घाला.
पालकांनो, लक्ष द्या..
आपली मुलं काय करताहेत, याकडे बर्याचदा पालकांचं लक्षच नसतं. बर्याचदा मुलंही अशा गोष्टी पालकांपासून लपवून ठेवतात. पण पालकांनी याकडे सजगतेनं पाहायला हवं, मुलं जर डाएट पिल्स घेत असतील तर त्यांना रोखायला हवं असं कळकळीचं आवाहनही शास्त्रज्ञांनी केलं आहे. या डाएट पिल्स मुलांच्या हार्मोन्सवर तर घातक परिणाम करतातच, पण शारीरिक आणि मानसिक वाढीवरही आघात करतात. आपली मुलं जर डाएट पिल्स घेत असतील तर त्यांना वेळीच त्यापासून थांबवा, नाहीतर केवळ भगवंतच त्यांना त्यापासून वाचवू शकेल.