(Image Creadit : Woman's Day.com)
पेरिटोनियल कॅन्सर फार कमी लोकांमध्ये आढळून येत असला तरिही हा एक गंभीर आजार आहे. पुरूषांपेक्षा महिलांना हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. हा कॅन्सर पोटाच्या खालच्या भागाला प्रभावित करत असून या कॅन्सरची लक्षण ओवरियन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाच्या कर्करोगाप्रमाणेच असतात. त्यामुळे अनेक महिला ओवरियन कॅन्सर आणि पेरिटोनियल कॅन्सर यामध्ये गोंधळून जातात. लक्षणांमध्ये बऱ्यापैकी साधर्म्य असल्यामुळे अनेकदा डॉक्टरही नक्की कोणता कॅन्सर आहे, हे ओळखण्यात गोंधळ घालतात. जाणून घेऊयात पेरिटोनियल कॅन्सरबाबत काही खास गोष्टी, ज्यामुळे तुम्हाला ओवरियन कॅन्सर आणि पेरिटोनियल कॅन्सर यांमधील फरक ओळखण्यास मदत होईल.
पेरिटोनियल कॅन्सरची लक्षण :
पेरिटोनियल कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला ओळखणं फार कठिण असतं. हळूहळू या लक्षणांमध्ये वाढ होत जाते. परिणामी शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
- पोटदुखी
- पोटात गॅसशी समस्या
- पोटामध्ये सूज येणं
- थोडसं जेवल्यानंतरही पोट भरल्याप्रमाणे वाटणं
- सतत चक्कर येणं
- डायरिया
- अनेक दिवसंपासून बद्धकोष्ठासारख्या समस्यांचा सामना करणं
- लघवी करताना वेदना होणे
- भूक न लागणं
- अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं
- पाळीव्यतिरिक्त योनितून रक्तस्त्राव होणं
- श्वास घेताना त्रास होणं
पुरूषांपेक्षा महिलांवर जास्त प्रभाव
पेरिटोनियल कॅन्सरची लक्षणं पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येतात. ज्या महिला ओवरियन कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतात त्यांना पेरिटोनियल कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. याव्यतिरिक्त वाढत्या वयात हा आजार होण्याचा धोका आणखी वाढतो. या कॅन्सरचा परिणाम यूट्रस, ब्लॅडर आणि रेक्टमवर होतो. त्यामुळे अनेकदा महिलांचा असा समज होतो की, ही लक्षणं ओवरियन कॅन्सरचीच आहेत.
(Image Creadit : Medical News Today)
पेरिटोनियल कॅन्सर आणि ओवरियन कॅन्सरचा परस्परांशी असलेला संबंध
पेरिटोनियल कॅन्सर आणि ओवरियन कॅन्सरमधील फरक ओळखणं अनेकदा डॉक्टरांनाही अशक्य होतं. यामागील मुख्य कारण म्हणजे, ओवरिज आणि पेरिटोनियल दोन्ही एपिथेलियल सेल्सपासून तयार होतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये लक्षणं सारखीच दिसून येतात. परंतु या दोन्ही कॅन्सरमधील मुख्य फरक म्हणजे पेरिटोनियल कॅन्सर ओवरीज काढलेल्या महिलांना होण्याचा धोका अधिक असतो. ओवरियन कॅन्सर फक्त ओव्हरिजमध्ये होतो. परंतु पेरिटोनियल कॅन्सर हा पोटाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. पेरिटोनियल कॅन्सरच्या कारणांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. परंतु काही वैज्ञानिकांच्या मते, जन्माच्यावेळी आढळून येणाऱ्या काही दोषांमुळे हा कॅन्सर होतो.
पेरिटोनियल कॅन्सरच्या तपासण्या आणि उपचार
या आजारांच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये साधारणतः पोटामध्ये सूज येणं, चक्कर येणं आणि वेदना होणं यांसारख्या समस्या उद्भवतात त्यामुळे अनेकदा डॉक्टर अल्ट्रासाउंडसारख्या तपासण्या करण्याचा सल्ला देतात. पेरिटोनियल कॅन्सरवर उपचार करताना डॉक्टर आधी तुमच्या इतर अन्य काही तपासण्या करण्याचा सल्ला देतात. तसेच तुम्हाला आधी कोणत्या आजारांचा सामना करावा लागला असेल तर त्याचा अभ्यास करतात. या सर्व तपासण्यांमधून जर कॅन्सरची लक्षणं आढळून आली तर त्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात येतात.