दोन्ही समितींच्या चौकशी अहवालात तफावत बालमृत्यू प्रकरण : स्थानिक चौकशी समितीचे निष्कर्ष अमान्य
By admin | Published: February 05, 2016 12:33 AM
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरणी स्थानिक चौकशी समिती व उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे आयएमएने स्थानिक चौकशी समितीच्या अहवालावर आक्षेप घेत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरणी स्थानिक चौकशी समिती व उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे आयएमएने स्थानिक चौकशी समितीच्या अहवालावर आक्षेप घेत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. बालमृत्यूप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.के. शेळके यांनी स्थानिक चौकशी समिती स्थापन केली होती. यामध्ये आरोग्य उपसंचालकांच्या पत्रानुसार डॉ. शेळके यांनी उपसंचालकांना या प्रकरणाची माहिती सादर केली होती. यामध्ये असा निष्कर्ष काढला होता की, डॉ. मंदार काळे यांनी कर्तव्यात कसूर केला आहे. या उलट उच्च स्तरीय चौकशी समितीने म्हटले आहे की, डॉ. मंदार काळे (कंत्राटी) यांनी त्यांच्या १० पानी जबाबात व आकडेवारी चौकशी समितीस सादर केली असून त्यांनी कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा अथवा कार्यात कसूर केला नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१३ ते जुलै २०१३ दरम्यान नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे २३.३८ टक्के होते, त्यांच्या नियुक्तीनंतर ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१४ दरम्यान ते १९.१६ टक्के इतके कमी झाले. सदर बाब मनुष्यबळाची कमतरता यामुळे असल्याचे नमूद केली आहे तसेच त्यांना नेमून दिलेली कामे त्यांनी पूर्ण केली असून त्यास उच्चस्तरीय चौकशी समितीने सहमती दर्शविली आहे. या शिवाय अतितातडीच्या वेळी डॉ. मंदार काळे यांना बोलविले असता ते उपस्थित राहिले नाही, असे स्थानिक चौकशी अहवालात म्हटले आहे. तर उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे की, इमर्जन्सी कॉल अटेण्ड केल्याचे कॉल रजिस्टरबद्दल डॉ. मंदार काळे यांना कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत त्यांनी नमूद केले असून बहुतांश मृत्यू अतिगंभीर आजारामुळे झाल्याचे म्हटले आहे, त्यालाही उच्चस्तरीय चौकशी समितीने सहमती दर्शविली आहे. याशिवाय डॉ. शेळके यांनी येथील नवजात शिशू कक्षातील अधिकारी, कर्मचार्यांची संंख्या, येथे उपलब्ध सुविधा यांची माहिती सादर केली आहे तर उच्च स्तरीय समितीने येथे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे म्हणत रिक्त पदे आढळून आल्याचे म्हटले आहे. यामुळेच आयएमए संघटनेने डॉ. शेळके यांनी कोणतीही शहानिशा न करता अहवाल सादर केल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. उच्चस्तरीय चौकशी समितीनेही तसा ठपका ठेवला आहे.