जर तुम्हाला रंग ओळखताना त्रास होत असेल तर तुम्हाला एकच गोष्ट वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसू लागते. असं होत असल्यास चुकूनही दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही लक्षणं कलर ब्लाइंडनेसची असू शकतात. कलर ब्लाइंडनेस फारसा गंभीर आजार नसला तरिही रंग ओळखताना अनेक समस्यांचा सामाना करावा लागतो. त्यामुळे पीडीत व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जास्तीत जास्त रूग्णांमध्ये कलर ब्लाइंडनेसची समस्या ही अनुवंशिक कारणांमुळे होते. तर अनेक लोकांना ठराविक वयानंतर या समस्येचा सामना करावा लागतो.
(Image Credit : usabilla.com)
कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय?
डोळे म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे ज्ञानेंद्रीय. ज्या ऑक्यूलर पेशींद्वारे आपण रंग ओळखतो त्यांना कोन्स असं म्हणतात. प्रत्येक कोनचा वापर करून आपल्याला जवळपास 100 रंगांना पाहता येतं. सामान्यतः लोकांमध्ये तीन प्रकारचे कोन्स असतात. ज्यांना 'ट्रायकोमॅटिक' असं म्हणतात. याव्यतिरिक्त ज्या व्यक्ती कलर ब्लाइंडनेसच्या समस्येने त्रस्त असतात अशा व्यक्तींमध्ये फक्त दोनच कोन असतात त्यांना 'डायक्रोमॅटिक' असं म्हणतात. या कोनांमध्ये ज्यावेळी साधर्म साधले जात नाही त्यावेळी रंग ओळखताना त्रास होतो.
अनुवांशिक कारण
अनेक प्रकरणांमध्ये या समस्यांसाठी अनुवांशिक कारणं जबाबदार ठरतात. अशा व्यक्तींना जन्मापासूनच कलर ब्लाइंडनेसच्या समस्येचा सामना करावा लागतो. खर तर रंग ओळखण्यासाठी तीन कोनांचे प्रकार असतात, लाल, हिरवा आणि निळा. जर जन्मतः यापैकी एका जरी कोनाची कमतरता असेल तर रंग ओळखताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
अनेक आजारांमुळेही होऊ शकते कलर ब्लाइंडनेसची समस्या
आनुवांशिक कारणांव्यतिरिक्त इतरही अनेक आजारांमुळे कलर ब्लाइंडनेसची समस्या उद्भवते. वाढत्या वयामुळेही या समस्येचा सामना करावा लागू शकतो. डोळ्यांच्या इतर समस्या म्हणजे, ग्लूकोमा, डायबिटिक, रेटीनोपॅथी यांसारख्या आजारांमुळेही रंग ओळखण्याची समस्या होऊ शकते. डोळ्यांमध्ये जखम आणि औषधांच्या साइड इफेक्टमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स लावणं तात्पुरता उपचार
ज्या रूग्णांना काही खास रंग ओळखताना त्रास होत असेल तर डॉक्टर्स त्यांना रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचा सल्ला देतात. परंतु लेन्स हा त्यावरील उपचार नसून अनेकदा त्यामुळे डोळ्यांना इतर समस्या होतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांना रंगीत कॉन्टॅक लेन्स वापरल्यानंतर दैनंदिन जीवनात काही कामांमध्ये मदत मिळते. याव्यतिरिक्त कॉन्टॅक्ट लेन्स हे अन्य उपचारांपेक्षा फार स्वस्त मिळतात. त्यामुळे लोक यांचा वापर करतात.