संसर्गित डास चावल्यामुळे पसरणारे आजार म्हणजे डासजन्य आजार. भारतात सर्वाधिक आढळून येणारे डासजन्य आजार पुढील प्रमाणे आहेत
१. मलेरिया अनोफेलेस डासाची मादी चावल्यामुळे होणारा मलेरिया हा आजार गंभीर आहे आणि काहीवेळा जीवघेणा देखील ठरू शकतो. मलेरियाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला खूप ताप, थंडी वाजल्याने अंग कापणे आणि फ्ल्यू झाल्यामुळे आजारपण येणे अशी लक्षणे दिसून येतात. मलेरिया हा जरी जीवघेणा आजार असला तरी हा आजार आणि त्यामुळे मृत्यू ओढवणे या दोन्ही गोष्टी टाळता येण्याजोग्या आहेत. क्लासिकल मलेरियाचा अटॅक ६ ते १० तास टिकतो (पण हा क्वचितच आढळतो). यामध्ये - • एक शीत टप्पा असतो, ज्यामध्ये रुग्णाला थंडी वाजते, अंग कापते. • एक उष्ण टप्पा असतो, ज्यामध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, लहान मुलांच्या बाबतीत आकडी येणे अशी लक्षणे दिसतात. • सरतेशेवटी, घाम येण्याचा टप्पा असतो, ज्यामध्ये रुग्णाला घाम येतो, शरीराचे तापमान सर्वसामान्य होते, थकवा जाणवतो.
संसर्गाबरोबरीनेच जर रुग्णाच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊन गुंतागुंत झाली किंवा रक्तात अथवा पचनसंस्थेत विकृती निर्माण झाल्या तर त्याला गंभीर मलेरिया असे म्हणतात. गंभीर मलेरियामध्ये पुढील गोष्टी घडतात - • सेरेब्रल मलेरिया - रुग्णाच्या वर्तनात विचित्रपणा येतो, त्याला नीट शुद्ध नसते, आकडी येते, रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा इतर न्यूरोलॉजिकल विकृती होऊ शकतात. • हेमोलिसिस (लाल रक्तपेशींचा नाश) मुळे गंभीर स्वरूपाचा ऍनिमिया (अशक्तपणा) होऊ शकतो.• हिमोग्लोबिनूरिया- हेमोलायसिसमुळे लघवीमध्ये रक्त येते.• अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) म्हणजेच श्वसनाला तीव्र त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये दाह उत्पन्न होतो, ज्यामुळे ऑक्सिजनच्या देवाणघेवाणीत अडथळे येतात. • रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत विकृती निर्माण होतात. • हृदय व रक्तवाहिन्या यंत्रणेत बाधा निर्माण झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो. • मूत्रपिंडाला तीव्र इजा होते. • हायपरपेरासिटीमिया - यामध्ये 5% पेक्षा जास्त लाल रक्तपेशी मलेरियाच्या परजीवींमुळे संक्रमित होतात. • मेटाबोलिक एसिडोसिस (रक्तात आणि ऊतकांच्या द्रव्यांमध्ये आम्लाचे प्रमाण वाढते), बहुतेकदा हायपोग्लाइसीमियासोबत • हायपोग्लाइसीमिया (रक्तातील शर्करा कमी होते) ज्यांना मलेरियाची गुंतागुंत नाही अशा गर्भवती स्त्रियांना हायपोग्लाइसीमिया होऊ शकतो, किंवा क्विनिनच्या उपचारानंतर देखील होऊ शकतो.
गंभीर मलेरिया ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे आणि त्यावर अतिशय तातडीने उपचार केले जाणे गरजेचे असते.
२. झिका विषाणू झिका हा आजार बहुतांश प्रमाणात एडीस जातीच्या संसर्गित डासाच्या चावण्याने पसरतो. हे डास दिवसा व रात्री चावू शकतात. हा आजार गर्भवती मातेकडून तिच्या गर्भाला होऊ शकतो. गर्भारपणामध्ये हा आजार झाल्याने बाळामध्ये जन्मापासून काही विकृती येण्याची शक्यता असते. अजूनपर्यंत झिका या आजारावर काही औषध किंवा लस उपलब्ध नाही. झिका विषाणूने संसर्गित अनेक लोकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत किंवा खूपच सौम्य लक्षणे आढळतात. झिका आजार झाला आहे अथवा नाही हे निश्चित करण्यासाठी डॉक्टर्स सर्वसामान्यतः रक्त किंवा लघवीची तपासणी करवून घेण्यास सांगतात.
३. चिकनगुनिया संसर्गित डास चावल्याने चिकनगुनियाचा विषाणू पसरतो. ताप आणि सांधेदुखी ही या आजाराची सर्वसामान्यतः दिसून येणारी लक्षणे आहेत. त्याबरोबरीनेच डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे अशी लक्षणे देखील उत्पन्न होऊ शकतात. संसर्गित डास चावल्यानंतर साधारणपणे ३ ते ७ दिवसांत लक्षणांची सुरुवात होते. चिकनगुनिया हा काही जीवघेणा आजार नाही पण लक्षणे मात्र खूपच त्रासदायक ठरू शकतात. बहुतांश रुग्णांना आठवडाभरात बरे वाटू लागते. पण काही व्यक्तींच्या बाबतीत सांधेदुखी बरेच महिने कायम राहू शकते.
हा आजार अधिक गंभीर झाल्याने ज्यांना त्यापासून धोका उत्पन्न होऊ शकतो अशांमध्ये जन्माच्या वेळेस संसर्गित झालेली नवजात बाळे, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग अशा आजारांनी पीडित व्यक्ती यांचा समावेश होतो. या आजाराचा संसर्ग एकदा एका व्यक्तीला झाला की भविष्यात त्या संसर्गापासून त्या व्यक्तीचे रक्षण होऊ शकते. हा आजार टाळण्यासाठी लस किंवा त्यावर उपचारांसाठी औषध उपलब्ध नाही.
चिकनगुनियाचा संसर्ग झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांवरील उपचारांसाठी - • भरपूर आराम करावा. • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ते कोरडे पडू नये यासाठी द्रव पदार्थांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे. • ताप आणि अंगदुखी कमी व्हावी यासाठी पॅरासिटेमॉलसारखी औषधे घ्यावीत. • डेंग्यूची शक्यता जोवर पूर्णपणे पुसली जात नाही तोवर ऍस्पिरिन आणि इतर नॉन-स्टिरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधांचे सेवन करू नये, त्यामुळे ब्लीडींगचा धोका कमी होईल. • जर तुम्ही इतर कोणत्या आजारासाठी औषधे घेत असाल तर त्यासोबत अजून औषधे घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोला.
४. डेंग्यू ताप - एडीस जातीचा डास चावल्याने डेंग्यूचे विषाणू पसरतात. जगभरात १०० पेक्षा जास्त देशांमध्ये डेंग्यू हा आजार आढळून येतो. डेंग्यूचा संसर्ग झालेल्या चार जणांपैकी एक व्यक्ती आजारी पडते. डेंग्यूने आजारी असलेल्या काही व्यक्तींमध्ये लक्षणे तीव्र असतात तर काहींच्या बाबतीत ती सौम्य असतात. डेंग्यू जर गंभीर स्वरूपाचा असेल तर तो काही तासांत जीवघेणा ठरू शकतो, त्यासाठी रुग्णाला इस्पितळात भरती करून त्यावर उपचार करणे गरजेचे असते. ताप, मळमळ, उलट्या, पुरळ, अंगदुखी (डोळे चुरचुरणे, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, स्नायू, सांधे किंवा हाडे दुखणे) ही डेंग्यूची सर्वसामान्य लक्षणे आहेत.
डेंग्यूची लक्षणे २ ते ७ दिवस टिकतात. बहुतांश व्यक्ती आठवडाभरात बऱ्या होतात पण अधिक काही गुंतागुंत होऊ नये यासाठी त्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवणे खूप आवश्यक असते.
डासांमुळे पसरणाऱ्या रोगांमुळे भारताला प्रचंड प्रमाणात आर्थिक परिणाम सोसावे लागतात. असे अनुमान वर्तवण्यात आले आहे की जर आपण डास-जन्य आजार भारतातून कायमचे नष्ट करू शकलो तर आपले सरासरी आयुर्मान तीनपेक्षा जास्त वर्षांनी वाढू शकेल आणि आपल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न जवळपास १ टक्क्याने वाढेल.
-डॉ. संदीप दोशी, कन्सल्टन्ट, इंटर्नल मेडिसिन अँड एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल