Diwali 2017 : दिवाळीत मौज-मस्तीबरोबरच आरोग्यही सांभाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 8:15 AM
दिवाळीदरम्यान जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन केल्याने मात्र वजन वाढण्याबरोबरच इतर आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत मौज-मस्ती बरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.
-रवींद्र मोरे सण-उत्सव आले म्हणजे विविध खाद्यपदार्थांची मेजवानी आलीच आणि भारतीय सण तर स्वादिष्ट खाद्यान्नांशिवाय अपूर्णच आहेत. त्यातच दिवाळीला तर आपण सर्वचजण मौज-मस्तीबरोबरच मिठाई आणि विविध चविष्ठ पदार्थांना प्राधान्य देतो. दिवाळीदरम्यान जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन केल्याने मात्र वजन वाढण्याबरोबरच इतर आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत मौज-मस्ती बरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. * दिवसभराचे नियोजन करावे सणासुदीच्या दिवसात बऱ्याचदा आपले मित्र-नातेवाईकांकडे येणे-जाणे सुरु असते, त्यामुळे बऱ्याचप्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन होते. यापासून बचावासाठी आपण संपूर्ण दिवसाचे नियोजन करायला हवे. जर रात्री दिवाळीच्या पार्टीत जायायचे असेल तर आपला ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण अगोदरच हलके असावे आणि पार्टीला जाण्याअगोदर काही हेल्दी स्रॅक्स सेवन करून जावे, जेणेकरुन पोट भरलेले राहील. पार्टीच्या ठिकाणी हेवी आणि रिच पदार्थ सेवन करणे टाळावे. * घरात बनलेल्या मिठाई बाजारात बनविलेल्या मिठाईमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. याशिवाय यात अतिरिक्त कृत्रिम रंग आणि मेटानिल येलो, लेड नाइट्रेट, म्यूरिएरिक अॅसिडसारखे हानिकारक रसायनेदेखील असतात. यामुळे मोठ्याप्रमाणात शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. यासाठी घरातच बनलेल्या मिठाईंचे सेवन करणे आरोग्यदायी ठरेल. * आरोग्यदायी स्रॅकिंग बऱ्याचदा आपण दिवाळीदरम्यान गोड पदार्थांबरोबरच मीठ आणि वसायुक्त पदार्थही मोठ्याप्रमाणात सेवन करतो. याचाही परिणाम आरोग्यावर होतो. यासाठी या पदार्थांना आरोग्यदायी ट्विस्ट देण्यासाठी बनविण्याच्या पद्धतीत बदल करणे हा देखील एक चांगला उपाय ठरु शकतो. जसे की, तळण्याऐवजी बेक करावे. बेक केलेल्या चकल्या आणि पुड्या, कमी वसायुक्त खाखरा आणि भाजलेला चिवडा आदी पदार्थ चविष्ट तर असतातच शिवाय स्वास्थवर्धकही असतात. * भरपूर पाणी या दिवसात भरपूर धावपळ असल्याने आपण बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करत नाही. पाण्याच्या कमतरतेने थकवा आणि कमजोरी येते. तसेच हा थकवा घालविण्यासाठी बऱ्याचदा गोड सरबत आणि एरियेटिड ड्रिंक्स सेवन करतो. त्यामुळे वेगाने वजन वाढते आणि आरोग्यही खराब होते. * खाद्यपदार्थांवर नियंत्रण विशेष खाद्यपदार्थ फक्त अशा सणासुदीच्या दिवसातच तयार केले जातात. बऱ्याचदा आनंदाच्या या प्रसंगी मोठ्याप्रमाणात या पदार्थांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले जाते. त्यामुळे साहजिकच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. * मिठाईचा कालावधीही घ्या लक्षात बऱ्याचदा आपण दिवाळीनिमित्त मिठाई जास्त प्रमाणात बनवितो. त्यात मिठाई दूध आणि क्रीमपासून बनलेल्या असतात. ज्या जास्त दिवस साठवण केल्याने खराब होतात. अशा मिठाईंचे सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यासाठी उरलेल्या मिठाई आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना वाटू शकतात. ज्यामुळे त्यांच्याही आनंदात वाढ निर्माण होईल.