(Image Credit : Food Navigator)
अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळ घालतो. एवढचं नाही तर बऱ्याच गोष्टी विसरतोही. विसरण्याच्या या सवयीला सामान्य गोष्ट समजून दुर्लक्षं केलं जातं. परंतु ही सवय जर वेळेसोबत वाढत गेली तर मात्र ही साधारण गोष्ट असत नाही. जर तुम्हीही सतत गोष्टी विसरत असाल, तर तुम्हीही अल्झायमर सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असू शकता. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्षं करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून विसरण्याच्या आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतं असल्याचे सिद्ध झाले आहे.
संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, ज्या व्यक्ती दररोज एक्सरसाइज करतात किंवा घरातील दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतात, त्यांच्यामध्ये गोष्टी विसरण्याचे प्रमाण फार कमी दिसून येते. संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, जर व्यक्ती दररोज शारीरिक हालचाली करत असेल तर त्याचं आरोग्य उत्तम राहतं तसेच मेंदू अॅक्टिव्ह राहण्यासही मदत होते.
वयाने जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये अल्जायमरची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी दररोज जर व्यायाम किंवा घरातील काम करण्यास सुरुवात केली तर त्यांच्या आरोग्यासोबतच त्यांची स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते. संशोधनातून असं स्पष्ट होतं की, आरोग्य सुधारण्यासाठी, मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यायाम हा सर्वात फायदेशीर आणि स्वस्त उपाय आहे.
अमेरिकेतील रश यूनिवर्सिटीतील एरोम एस बुचमॅन यांनी सांगितले की, आम्ही संशोधनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या दोन वर्षांआधीच्या शारीरिक हालचालींचे आकलन केले. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर दान करण्यात आलेल्या मेंदूतील पेशींचा अभ्यास केला. त्यातून असं समोर आलं की, सक्रिय जीवनशैलीमुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम दिसून येतात.
संशोधकांना असं आढळून आलं की, मेंदूमध्ये अल्झायमरची लक्षणं अस्तित्वात असतील तर शरीराला सक्रिय ठेवल्याने स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत होते.
या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, जर तुम्ही तुमच्या शरीराला अॅक्टिव्ह ठेवत असाल तर अल्झायमरसारख्या महाभयंकर आजारापासून बचाव करू शकता. अल्झायमरची लक्षणं जास्त करून वृद्धांमध्ये दिसून येतात.
नेमकं अल्झायमर म्हणजे काय?
अल्झायमर (Alzheimer's Disease) हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते. या आजारावर अजून काहीही ठोस उपाय नसून सुरुवातीच्या काळात नियमीत तपासणी आणि उपचाराने यावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं.