राग मनात ठेवून झोपी जाऊ नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 4:33 PM
वैज्ञानिकांच्या एका चमूने केलेल्या संशोधनानुसार मनात राग किंवा चीड ठेवून झोपी गेल्याने त्या भावना लवकर विसरता येत नाही.
झोप आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप झाल्यावर कसे प्रसन्न वाटते! पण तुम्हाला माहित आहे का की, झोपेमुळे नकारात्मक भावना दीर्घकाळासाठी आपल्या मनात घर करून बसतात? वैज्ञानिकांच्या एका चमूने केलेल्या संशोधनानुसार मनात राग किंवा चीड ठेवून झोपी गेल्याने त्या भावना लवकर विसरता येत नाही.चीन आणि अमेरिकेतील संशोधकांनी मिळून केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, वादविवाद झाल्यावर लगेच झोपी गेल्याने त्याची नकारात्मक आठवण मनात कोरली जाते. त्यामुळे झोपण्याआधी तुमचे कोणाशी भांडण झाले असेल किंवा खूप राग आला असेल तर तो शांत करून झोपण्याचा सल्ला संशोधनाच्या सहलेखिका युन्झे लिऊ यांनी दिला.लिऊ आणि सहकाऱ्यांनी ७३ कॉलेज विद्यार्थ्यांना या संशोधनात सहभागी करून घेतले होते. झोपेचा स्मरणशक्तीवर कसा परिणाम होता याचा ते अभ्यास करत होते. काही विशिष्ट चित्रांशी नकारात्मक आठवणी जोडण्याचे त्या विद्यार्थ्यांना दोन दिवस प्रशिक्षण दिले गेले. मग त्यांना पुन्हा हे चित्र दाखवून त्या नकरात्मक भावना आठवा किंवा त्या विसरून जाण्यास सांगितले. शांत झोपादोन वेळा हा प्रयोग करण्यात आला. एकदा सर्व विद्यार्थ्यांची झोप झाल्यावर आणि एकदा प्रशिक्षणानंतर केवळ अर्ध्या तासाने. दरम्यान त्यांच्या मेंदूचे स्कॅन करणे चालूच होते. रात्री झोप घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना नकरात्मक भावना विसरणे जरा जड गेल्याचे दिसून आले. स्कॅनिंगमधून स्पष्ट झाले की, त्या नकारात्मक भावना लाँग-टर्म मेमरीच्या भागात साठवलेल्या होत्या.या संशोधनामुळे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डरच्या (पीटीएसडी) रुग्णांवर परिणामकारक उपचार करण्यास खूप मदत होणार आहे.