Fruits Eating Mistakes : आपल्या शरीरासाठी वेगवेगळी फळं किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहीत असेलच. कारण फळांचं सेवन केल्याने शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व मिळतात. इतकंच काय तर अनेक फळं खाऊन तुम्ही शरीराच्या वेगवेगळ्या समस्याही दूर करू शकता. सफरचंदसारखं फळ जर तुम्ही नियमित खाल्लं तर हृदयरोगाचा धोका खूप कमी होतो. पण बरेच लोक फळांचं सेवन करत असताना काही चुका करतात. या चुका जर केल्या तर फळांपासून फायद्यांऐवजी नुकसान जास्त होतं. आज फळं खाताना कोणत्या चुका करू नये हे आपण जाणून घेणार आहोत.
तुम्हाला फळांमधील पोषक तत्वांपासून शरीरासाठी फायदा मिळवायचा असेल तर फळं योग्य पद्धतीने खाणं गरजेचं आहे. फळं खाण्यादरम्यान काही चुका टाळल्या पाहिजे.
रिकाम्या पोटी ही फळं खाऊ नये
आंबट फळं जसे की, संत्री, लिंबू आणि द्राक्ष इत्यादी फळं रिकाम्या पोटी कधीच खाऊ नयेत. असं जर केलं तर तुम्हाला गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. या फळांमध्ये अॅसिड असतं ज्यामुळे ही समस्या होते.
दुधासोबत कोणतं फळ खाऊ नये
दूध आणि केळी सोबत खाल्ल्याने तुम्हाला खूपसारे फायदे मिळतात. पण हे इतर फळांसोबत लागू पडत नाही. जसे की, दूध आणि पपई किंवा लीचीचं सेवन करणं मोठी चूक ठरेल. असं केलं तर दूध आणि फळं पचवण्यास समस्या होते.
रात्री फळं खाता?
रात्री जर फळांचं सेवन करणं काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्याने पोटात गॅस आणि अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. फळांचं सेवन नेहमी सकाळी किंवा दुपारी करावं. तेव्हाच त्यांतील पोषक तत्वांचा अधिक फायदा मिळतो.
जेवणासोबत फळं टाळा
जेवणासोबत किंवा जेवण केल्यावर लगेच फळं खाणं टाळलं पाहिजे. याने तुम्हाला अन्न पचनास समस्या होऊ शकते. दुपारचं जेवण केल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनंतर फळं खावीत.
फळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिता?
फळं खाल्ल्यावर लगेच पाणी पित असाल तर ही सवय लगेच बंद करा. असं केल्याने पचन क्रिया हळूवार होते. फळं खाल्ल्यानंतर 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे.
जास्त वेळ फळं कापून ठेवता?
फळं जास्त वेळ कापून तशीच ठेवल्याने त्यातील पोषक तत्व कमी होतात. तसेच फळं लवकर खराब होतात. फळांपासून फायदा मिळवण्यासाठी ती लगेच खावीत.