सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी पुरूषांपेक्षा महिलांना अनेक शारीरिक तक्रारींना सामोरं जावं लागतं. अनेकदा महिला आपल्या काही शारीरिक तक्रारींना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करतात. पण असं दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे या छोट्या छोट्या समस्यांचं रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होऊ शकतं.
आज आपण जाणून घेऊयात महिलांच्या अशा समस्यांबाबत ज्यांना त्या छोट्या समजून दुर्लक्ष करतात. तुम्हालाही यातील कोणत्याही समस्येचा खूप दिवसांपासून त्रास होत असेल तर लगेचच डॉक्टरांकडून तपासणी करणं गरजेचं आहे.
अंगदुखी
जर तुमच्या शरीराच्या कोणताही भाग 3 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका. हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.
वजन कमी होणं
जर तुमचं वजन मेहनत अथवा व्यायाम न करता कमी झालं असेल तर वेळीच सावध व्हा. कोणतंही कारण नसताना दर आठवड्याला 2-3 किलोग्रॅम वजन कमी होणं कॅन्सर, थायरॉइड यांसारख्या गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वजन कमी होत असेल तर एकदा चेकअप करून घेणं गरजेचं आहे.
थकवा येणं
जर थकवा आठवड्यापेक्षा जास्त काळ जाणवत असेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. काम केल्यानंतर थकवा येणं साधारण बाब आहे. परंतु, अनेकदा महिला थोडसं काम केल्यानंतरही थकून जातात. असं होणं हे कोणत्याही मोठ्या आजारांचा संकेत असू शकतो.
खोकला येणं
पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो त्यामुळे अनेकदा सर्दी खोकल्यासारख्या समस्या होतात. परंतु, एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला टिकून राहिला तर मात्र हे टीबी सारख्या गंभीर आजाराचं लक्षण असण्याची शक्यता आहे.
छातीत दुखणं
महिला अनेकदा छातीचं दुखणं क्षुल्लक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जर सतत छातीमध्ये दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर ही कॅन्सर, थायरॉइड, पोटाच्या समस्या आणि अल्सर सारख्या आजारांची लक्षणं असण्याची शक्यता असते.