जळगाव : कफ सिरप घेतल्याने गाम्बिया या आफ्रिकी देशात ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडून गेली आहे. त्यामुळे या औषधाच्या दुष्परिणामांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. खोकला आहे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही कफ सिरप घेणे रुग्णाच्या जीवासाठी धोक्याचे ठरू शकते. खोकला होण्याची कारणे वेगवेगळी असतात आणि त्याप्रमाणे औषधे द्यावी लागतात.
आपल्यापैकी बहुतेकजण खोकला झाल्यानंतर कोणी तरी सुचवलेले कफ सिरप घेतात; पण कफ सिरपचेही दुष्परिणाम असतात. खोकल्यावर कफ सिरप हा मुख्य उपचार नाही. खोकला अथवा कफ कशामुळे झाला आहे, याची कारणे शोधून मग औषधे दिली गेली पाहिजेत. जीवाणू वा विषाणू, परोपजीवी जंतू वा फंगस (कवक), ॲलर्जी यापैकी नेमकी कारणे काय आहेत, हे शोधण्याचे काम डॉक्टरच करू शकतात. त्यानुसार ते औषधांची योजना करतात.
वातावरण बदलाने वाढला सर्दी-खोकलापंधरा दिवसांपूर्वी पाऊस-ऊन अशा संमिश्र वातावरणामुळे सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढले होते. खोकताना तोंडावर रुमाल ठेवण्याची काळजी घ्यावी. मुलांना खोकला असेल, तर त्यांना शाळेत पाठवू नका. खोकल्याचा संसर्ग इतरांना होऊ शकतो, अशी माहिती डॉ. विकास जोशी यांनी दिली.
कुठलाही सिरप डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नकोखोकला कसा आहे, त्यावर औषधे कोणते द्यावे, हे अवलंबून असते. कोरडा खोकला असेल तर कफ पातळ करणारे घटक ज्या कफ सिरपमध्ये असतात ते द्यावे लागते. खोकताना बेडका पडत असेल तर कफ सप्रेसंट असणारे सिरप द्यावे लागते. खोकल्याचे सिरप दिल्यावर साधारपणे रुग्णाला झोप आल्यासारखे वाटते, त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे देऊ नयेत.
घरगुती काढा बराअद्रक काढा : आल्यापेक्षा सुंठ टाकून तयार केलेला चहा किंवा कॉफी मध्ये-मध्ये रुग्णाला पाजत राहावी.हळदीचा काढा : गरम दुधात हळद घालून ते दूध प्यावे. गरम पाण्याची वाफ घ्यावी.
चार-पाच दिवसांपेक्षा जास्त सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांना दाखवाचार ते पाच दिवसांपेक्षा जास्त सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांना दाखवा. एखाद्या गंभीर आजाराची सुरुवातदेखील असू शकते. त्यामुळे घरगुती उपाय करत राहण्यापेक्षा वेळेत डॉक्टरांना दाखवून केलेले निदान कधीही चांगले ठरते. निदान काय झाले आहे, त्यानुसार डॉक्टर औषधे देतात.
डॉक्टर म्हणतात...खोकल्याची कारणे शोधून प्रतिजीवात्मक औषधे दिली गेली पाहिजेत. खोकल्याच्या औषधाचे व्यसन लागते. हाही धोका असतो. रुग्णांनी स्वत:च्या मनाने औषधे घेऊ नयेत. विशेषत: दूध पिणारी लहान मुले, स्तनदा माता यांनी हे औषध घेणे टाळावे.- डॉ. भाऊराव नाखले, विभाग प्रमुख, औषधवैद्यक शास्त्र