आरोग्याविषयी जागरुक असलेले लोक सहसा सार्वजनिक स्वच्छतागृहं वापरणं टाळतात. त्यांना सार्वजनिक स्वच्छतगृहांमुळं मूत्रमार्गाला संसर्ग (UTI - युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन - Urinary Tract Infection) होण्याची भीती वाटते. सहसा, महिलांना याबद्दल खूप भीती असते.
सार्वजनिक शौचालयाच्या वापरामुळं मूत्रमार्ग संसर्ग झाल्यास त्याचा वाईट परिणाम महिलांवर अधिक होतो, हे खरं आहे. पण सार्वजनिक शौचालयांमुळं असा संसर्ग होतो, यात किती तथ्य आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं संसर्ग होत असल्याबाबत कोणताही शास्त्रीय पुरावा नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर डॉ. तान्या यांनी याबाबत लोकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. टॉयलेट सीटचा योग्य प्रकारे वापर केल्यास कोणत्याही प्रकारे यूटीआय होण्याची भीती नसते, असं त्यांनी म्हटलं आहे.
डॉ. तान्या इंस्टाग्रामवर डॉ. क्युटरस (Dr Cuterus) नावानं पेज चालवतात. एक व्हिडिओ शेअर करताना डॉ. तान्या म्हणाल्या की, हल्ली अनेक कंपन्या टॉयलेट सीट्स सुरक्षित करण्यासाठी भरपूर सॅनिटायझर्स विकत आहेत. मात्र, मूत्रमार्गाला होणारा संसर्ग टाळण्यासाठी या सॅऍनिटायझर्सचा उपयोग होत नाही.
अशा पद्धतीनं संसर्ग होणं कठीणडॉक्टर तान्या सांगतात की, या सॅनिटायझर्सचा कोणताही फायदा होत नाही. कारण, जर तुम्ही टॉयलेट सीटवर व्यवस्थित बसलात तर, संसर्गाचा धोका नसतो. तान्या यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कोणीही टॉयलेट सीटवर बसतं तेव्हा लघवी करताना तेथील अवयव टॉयलेट सीटला चिकटत नाही. डॉ. तान्या यांनी डमी यंत्राद्वारे समजावून सांगितलं की, सामान्यत: मूत्रमार्गाचा बाहेरील अवयव टॉयलेट सीटला चिकटत नाही. परंतु, जर तुम्ही टॉयलेटच्या कोपऱ्यावर चुकीच्या पद्धतीनं बसलात तर तो चिकटू शकतो. मात्र, असे होण्याची शक्यता नसते. डॉ. तान्या यांनी सांगितलं की, टॉयलेटमध्ये जरी वेगवेगळे संसर्गजन्य जीवाणू असले तरी, ते अचानक उडून मूत्रमार्गात (urinary tract / urethra) पोहोचणार नाहीत. त्यामुळं टॉयलेट सीटमधून बॅक्टेरिया किंवा जंतूंना मूत्रमार्गात प्रवेश करता येणं खूप कठीण आहे.
UTI टाळण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यकव्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की, बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी लघवी केल्यानंतर तो भाग कसा स्वच्छ करावा, हे शिकावं लागेल. त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितलं की, लघवी केल्यानंतर टिश्यू पेपर मागून पुसून मूत्रमार्गाकडं आणल्यास ही चुकीची पद्धत आहे. योग्य पद्धत म्हणजे मूत्रमार्गापासून सुरुवात करून तो परत टिश्यू पेपर मागे नेला पाहिजे. डॉ. तान्या सांगतात की, जर तुम्हाला UTI टाळायचं असेल, तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुरेसं पाणी पिणं आणि लघवी आल्यानंतर न रोखून धरणं. कारण शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं (dehydration) आणि लघवी अडवणं ही UTI ची सर्वांत मोठी कारणं आहेत.