बंगळुरू : हात, पाय, चेहराच इतकेच काय संपूर्ण अंगावर टॅटू काढणे ही हल्ली फॅशन झाली आहे. काहीजण बदलत्या ट्रेण्डनुसार सतत नवनवे टॅटूचे प्रयोग अंगावर करीत असतात. परंतु यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत असलेल्या घातक तत्त्वांमुळे त्वचेला धोका असतो. यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्नाटक सरकारने राज्यातील टॅटू पार्लरसाठी कठोर नियमावली लागू करण्याची योजना जाहीर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्नाटकचे आरोग्यमंत्री गुंडू राव यांनी सांगितले की, राज्य सरकार केंद्र सरकारला पत्र लिहून टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईला कॉस्मेटिक्सप्रमाणे वर्गीकृत करण्याची विनंती करणार आहे. हा निर्णय टॅटूच्या शाईच्या सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी घेतला आहे. अलीकडेच केलेल्या चाचणीत शाईमध्ये २२ धोकादायक पदार्थ आढळून आले होते ज्यामुळे त्वचेचे कर्करोग, हिपॅटायटीस बी आणि सी यांसारखे धोके संभवतात.
टॅटूच्या शाईत कोणते घातक पदार्थ?
टॅटूच्या शाईत अल्कोहोल, बेरियम, कॅडमियम, कॉपर, काच, पारा, निकेल, प्लॅस्टिक आणि व्हेजिटेबल डाय हे घटक असतात.
अनेकदा यासाठी वापरलेली शाई जुनी असते. ज्यामुळे त्वचेला संक्रमण होण्याची भीती असते. टॅटूसाठी जुन्या, आधी वापर झालेल्या, निर्जंतुक न केलेल्या सुईचा वापर झाल्यास आजारांचा धोका असतो.
कोणत्या आजारांची भीती?
शाईमुळे त्वचेच्या रोगांची भीती असते. अॅलर्जिक रिअॅक्शन येऊ शकतात. संक्रमित सुईमुळे एचआयव्हीची बाधा होण्याची भीती असते.
घातक तत्त्वांमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. एका अभ्यासानुसार टॅटूमुळे लिम्फोमा (रक्ताचा कर्करोग) होण्याचा धोका २१ टक्के वाढतो.
अमेरिकेत अलीकेडच केलेल्या एका अभ्यासात आढळले की, टॅटू आणि पर्मनंट शाईच्या तपासलेल्या ७५ पैकी २६ नमुन्यांमध्ये आजाराला कारणीभूत ठरणारे जीवाणू आढळले होते. हा अहवाल अप्लाइड अॅण्ड एन्व्हार्नमेंटल मायक्रोबायोलॉजी नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला होता.