हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल बऱ्याच लोकांना होत आहे. ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात इतरही अनेक समस्या होऊ लागतात. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं ही एक गंभीर आणि जीवघेणी समस्या आहे. अशात जर तुम्ही टेस्ट केली असेल आणि बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढलेली असेल तर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
High Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. या दोन्हींचं संतुलन ठेवणं फार गरजेचं असतं. गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी गरजेचा असतो आणि हा हृदयासाठी चांगलाही असतो. पण बॅड कोलेस्ट्रॉल वाढला तर अनेक समस्या होतात. याने हृदयासंबंधी अनेक समस्या वाढतात. अशात हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.
कोमट पाणी प्या
बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर थंड पाणी पिण्याऐवजी हलकं कोमट पाणी प्यावे. याने बॅड कोलेस्ट्रॉल डिटॉक्स आणि नसा मोकळ्या करण्यास मदत मिळेल. कोमट पाणी प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.
नियमित एक्सरसाइज करा
एक्सरसाइज केल्याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि तुम्ही वेगाने कॅलरी जाळू शकता. ज्यामुळे तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी केल्यानेही हाय कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते.
धुम्रपान बंद करा
धुम्रपान करणाऱ्या लोकांना केवळ फुप्फुसाची समस्या होते असं नाही तर त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यातील एक समस्या म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलही आहे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल त्यांनी अजिबात धुम्रपान करू नये. याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
ऑलिव्ह ऑइलचा वापर
एक्सपर्ट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करण्यास सांगतात. तर रिफाइंड ऑइल टाळण्याचा सल्ला देतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट शरीरासाठी फायदेशीर असतात. याने हृदयरोगांचा धोका कमी होतो.
प्रोसेस्ड फूड खाणं बंद करा
आजकाल जास्तीत जास्त लोक जंक आणि प्रोसेस्ड फूड जास्त खाणं पसंत करतात. हे फूड्स कोलेस्ट्रॉल वाढण्याचं एक मोठं कारण आहे. त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉलपासून बचावासाठी हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा. जास्त मसालेदार, तळलेले पदार्थ खाऊ नका. पौष्टिक आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
मद्यसेवन बंद करा
खूप जास्त मद्यसेवन करणं हे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. अशात तुम्ही मद्यसेवन केलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल आणखी जास्त वाढेल आणि तुम्हाला हृदयरोगाचा धोकाही वाढेल. त्यामुळे मद्यसेवन बंद करा.