-नितांत महाजनआपण तसे चांगलेच असतो. आपण सगळ्यांशी चांगलेच वागतो, लोकच आपल्याला त्रास देतात असं आपल्याला वाटतं. तसं होतंही. मात्र आपल्याही नकळत आपण आॅफिसमध्ये अशा काही चूका करत असतो की त्या आपल्याला छळतात. आपले पाय ओढतात. आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरतात. आणि आपल्याला ते कळतही नाही, जाणवतही नाही. लक्षात येत नाही. आणि आलंच तर आपण ते मान्यही करत नाही. मात्र तपासून पहा, आपण या चूका करतो का? करत असू तर मान्य करू की चूक आपलीच, आपण जरा आपलं तंत्र सुधारलं पाहिजे.१) आपण गप्प-घुमे?आपल्याला वाटतं आपण भलं, आपलं काम भलं. आपण बोलतो कमीच. गप्प राहतो. पण इतरांना वाटतं आपण घुमे आहोत, किंवा स्वत:ला शहाणं समजतो. जास्त फटकून राहतो. इतरांना कमी लेखतो. कामास काम बोलतो कारण आपण त्यांना मोजत नाही. मग लोक आपल्याला अकारण लेबल लावतात आणि सायडिंगला लावतात. टीममध्ये घेत नाहीत.२) काहीही हो, तुम्ही अतीच रिअॅक्ट करता?गोष्टी सोपी असते, साधं तुमचं टेबल पुसलेलं नसतं, किंवा तुमचं काम कुणी ऐकत नाही, किंवा फोन उचलत नाही असं काहीही बारीक सारीक मात्र तुम्ही असे काही चिडता, रिअॅक्ट करता की विचारू नका. आॅफिस डोक्यावर घेता,बडबडता, तोंड सोडता. आणि त्याचा परिणाम असा होतो की चिडके, अती शहाणे अशी लेबलं लागतात आणि लोक तुम्हाला टाळू लागतात.३) नाही, मी बिझी आहे?तुम्हाला कुणी जेवायला बोलावतं, पार्टीला बोलावतं, घरगुती कार्यक्रमाला बोलावतं किंवा सहकारी म्हणतात चल रे जरा चहा प्यायला, तुमचं एकच पालूपद, नाही, मी बिझी आहे. तुम्ही कुणाकडच्या कार्यक्रमाला जात नाही. कुणासोबत चहा पीत नाही. कुणाचं सुखदु:ख शेअर करत नाही. कदाचित तुम्ही खरंच कामात असाल पण त्यानं लोकांना काय वाटतं की, आपल्याला हा कमी लेखतो. गैरसमज होतात. आणि तुमचा स्ट्रेस वाढतो कारण लोक त्यानंतर तुम्हाला त्यांच्यात घेतच नाही.४) गॉसिप करता?तुम्हाला गॉसिप करायची फार सवय आहे. याचं त्याचं करता, सहज सांगता, बोलून जाता, लोकांच्या भानगडीत नाक खुपसता? मग तुमचं आॅफिसात नाव बदनाम झालंच समजा.५) सतत कटकट करता?काही लोक आॅफिसात आले की कटकट करायला लागतात. सतत भूणभूण. सतत चिडचिड. कशावरुनही कटकट. पगारवाढ, बॉस ते हवामान ते स्वच्छता ते इतर लोक ते काम कारणच लागत नाही. सतत कटकट, सतत निगेटिव्ह मोड. अशा सहकाऱ्यांना लोक कंटाळतात. ते आॅफिसचं वातावरण गढूळ करतात. त्यामुळे त्यांच्याकडे चांगली कामंही येत नाहीत.६) मतं मांडताना बेभान होता?आॅफिस म्हटलं की चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक चर्चा होतात. गप्पा रंगतात. सगळ्यांना सगळ्यांची मतं पटत नाहीतच. मात्र ते वाद तेवढ्यापुरते न ठेवता तुम्ही हमरीतुमरीवर येता? तावातावानं मतं मांडता? भांडता? आवाज चढवता? आणि त्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही. पण इतरांना मात्र वाटतं की तुम्ही आक्रमक आहात, लोकांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करता, ऐकून घेत नाही. दुसऱ्याच्या मतांची कदर करत नाहीत. तुम्ही अकारण मग भांडकुदळ ठरवले जाता.
आॅफिसमध्ये ‘असं’ वागता? मग लक्षात ठेवा, चूक तुमचीच!
By admin | Published: June 09, 2017 7:19 PM