झोपेचा आणि आपल्या मन:स्वास्थ्याचा किती जवळचा संबंध आहे, हे आपल्याला माहीत आहेच. हा विषय खूपच गहन, मोठा आणि महत्त्वाचा असूनही बहुतेकांचं त्याकडे दुर्लक्षच होतं. आत्यंतिक त्रास झाल्याशिवाय आपण त्याकडे पाहत नाही किंवा झोप लागत नाही म्हणून डॉक्टरांकडे जाण्याचंही आपण टाळतो. याबाबतीत एक मोठा विरोधाभास आहे. झोपेकडे आपण दुर्लक्ष करतो, पण त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मात्र बऱ्याचदा आपल्याला काळजी वाटते.
हे दुष्परिणाम म्हणजे कमी झोपेचेच बायप्रॉडक्ट आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. उदाहरणार्थ- कमी झोपेमुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, हार्ट ॲटॅक येऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतं, डायबेटिस होऊ शकतो.. यातलं काहीही झालं तरी आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. त्यांच्याकडून उपचार करून घेतो, पण ज्यामुळे आपल्याला हा त्रास होतोय ते मूळ कारण दुर्लक्षितच राहतं. त्याकडे आपण लक्षच देत नाही.
झोपेच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांना झोपेत दात खाण्याची सवय असते. झोपेत अनेकांचे दात कराकरा वाजतात. रात्री झोपेत आपण असं काही करतो, याची अनेकांना कल्पनाच नसते. तो कशाचा परिणाम आहे आणि त्यामुळे काय होतं हेच माहीत नसल्यानं त्यावर उपचार घेण्याचाही प्रश्नच येत नाही. अशा व्यक्तींच्या अगदी जवळ झोपणाऱ्या व्यक्तींनाच कदाचित ते समजू शकतं, पण त्यांनाही त्याचं गांभीर्य माहीत नसल्यानं हा प्रश्न अनुत्तरितच राहातो.
काही जणांना रात्री झोपल्यावर ऑक्सिजनची कमतरता जाणवते. त्यामुळे जोरजोरात श्वास घेणं, अस्वस्थ होणं, गुदमरल्यासारखं होणं, त्यामुळे झोपेतून जाग येणं असेही प्रकार घडतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, रात्री झोपेत ऑक्सिजनची कमतरता जाणवणं आणि दात खाणं यांचाही जवळचा परस्परसंबंध असू शकतो. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यासंदर्भात झालेल्या संशोधनानुसार तब्बल ५० टक्के मुलांना रात्री झोपेत दात खाण्याची सवय असते. त्यात १५ टक्के किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. आठ टक्के प्रौढांना, तर तीन टक्के ज्येष्ठांमध्येही ही समस्या दिसून येते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हीही रात्री झोपेत दात खात असाल, तर ते हसण्यावारी नेऊ नका. आपल्याला असं का होतं, याचा विचार करा आणि डॉक्टरांचाही सल्ला घ्या.