Afternoon sleep Tips : आजकाल जगभरातील लोकांना झोप न येण्याची समस्या भेडसावत आहे. ज्यामुळे शरीरात इतर गंभीर आजारही घर करत आहेत. झोप येत नसल्याने किंवा पुरेशी झोप घेत नसल्याने अनेक गंभीर आजार होतात. ज्यात हृदयरोग, चिंता, अंगदुखी अशा वेगवेगळ्या समस्या होतात. बरेच लोक दुपारीही झोपतात. काहींना दुपारी झोपण्याची सवय असते तर काही लोक रात्री झोप घेऊ शकत नाही म्हणून दुपारी झोपतात. पण दुपारी झोपणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर असतं का? दुपारी किती वेळ झोपलं पाहिजे? कसं झोपलं पाहिजे? हे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं.
बरेच लोक दुपारी काही वेळ झोप घेतात. यात घरात राहणाऱ्या महिलांचा, वृद्ध लोकांचा आणि काही प्रमाणात वयस्क लोकांचाही समावेश आहे. पण दुपारी झोप घेत असताना काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. अशात आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी दुपारच्या झोपेचे काही नियम सांगितले आहेत. डॉक्टर शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.
डॉक्टर शिंदे यांन दुपारी किती झोपावं किवा दुपारी झोपल्याने आपलं वजन वाढतं का? याबाबत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, "दुपारी तुम्हाला झोप घ्यायची असेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटेच झोप घ्यावी. तुम्ही जर दुपारी 1 तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, पोटावरील चरबी वाढेल, मेटाबॉलिज्म सिस्टीम बंद होईल. वजन वाढेल तसेच डायबिटीसचा धोकाही वाढेल. तसेच जेवण केल्यावर लगेच झोपू नये. याने वजन जास्त वेगाने वाढतं".
अशात आता तुम्ही जर नियमितपणे दुपारी झोप घेत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला ध्यानात ठेवा. नाही तर तुमचं वजनही वाढेल आणि पोटावरील चरबीही वाढेल. त्यासोबत वाढलेल्या वजनामुळे होणारे इतर आजरही शरीरात घर करतील.
काही रिसर्चमधूनही खुलासा...
एका रिसर्चनुसार, दुपारी जास्त वेळ झोपू नये. एक्सपर्ट सांगतात की, दुपारी जास्त वेळ झोपल्याने स्ट्रोकचा धोका 20 टक्के अधिक वाढतो. हे मेडिकल जर्नल ऑफ अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या शोधात सांगण्यात आलं आहे. यातून समोर आलं की, जे लोक दुपारी 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपतात त्यांना स्ट्रोकचा धोका 25 टक्के वाढतो.
मुद्दा दुपारी झोपण्याचा नाही तर काही लोकांची लाइफस्टाईल अशी असते की, ते रात्री केवळ काही तासच झोपू शकतात. असं करणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं. पुरेशी झोप न घेतल्याने डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, लठ्ठपणा आणि इतकंच काय तर डिप्रेशनही होऊ शकतं.