अनेकवेळा अचानकपणे वजन वाढणे किंवा कमी होणे, तसेच चेहरा आणि पायावर सूज येणे, काम करण्याची इच्छा न होणे, लालसा येणे, अशक्ततापणा जाणविणे, भूक न लागणे, जास्त प्रमाणात झोप येणे. तर महिलांच्या बाबतीत पाळी अनियमित होणे, केस गळणे त्यासोबतच गर्भधारणेसंदर्भात समस्या निर्माण होणे. तुम्हाला ही लक्षणे वाचून वाटेल ही सर्वसामान्य लक्षणे आहेत, ती कुणामधेही आढळून येऊ शकतात. मात्र ज्या व्यक्तींना थायराॅइडचा त्रास असतो त्या व्यक्तीमध्ये प्रकर्षाने जाणवणारी ही लक्षणे आहेत.
अनेकांना तपासणी केल्याशिवाय त्यांना हा आजार आहे ही माहितीसुद्धा कळत नाही. त्याकरिता डॉक्टरने तपासणी करून वैद्यकीय चाचण्या केल्या तरच या आजारचे निदान होऊन हा आजार नियंत्रणात येतो. विशेष म्हणजे भारतात चार कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना थॉयरॉइडचा त्रास आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना आहे. त्यांना याची समस्या अधिक भेडसावते. थायरॉइड हे गळ्याच्या पुढील भागात असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. ह्या ग्रंथीचे कार्य शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणे असते. ही ग्रंथी अन्नाचे रूपांतरण ऊर्जेत करते, जी आपल्या शरीरासाठी महत्त्वाची असते. यासोबतच श्वास, हृदय, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे कामही ती करत असते. कारण जर आपल्या शरीरातील ऊर्जाच संपली तर त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
थायराॅइडचे तीन प्रकार असतात हायपोथायरॉइडिझम - सामान्य भाषेत एखाद्या खेळण्याची बॅटरी संपली, तर त्या खेळण्याची जी अवस्था होते, तशीच अवस्था हा आजरा असलेल्या व्यक्तीची होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला सूज येते. वजन वाढते. आळस येतो. काम करण्याची इच्छा राहत नाही. काही वेळा हा आजार आनुवंशिकसुद्धा असतो. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात थकवा येतो. हायपर थायरॉइडिझम - काही वेळा या ग्रंथी अति-क्रियाशील असतात. यामध्ये नियमित जेवण असूनही वजन कमी होते. जुलाब होतात. सतत भीती वाटत राहते. धडधड वाढते. हात आणि पाय थरथरतात. गलगंड (गॉयटर) - यामध्ये ग्रंथीला मोठ्या प्रमाणात सूज येते. गळ्याच्या भोवती गाठ दिसून येते. काही वेळा ही गाठ शस्त्रक्रियेने काढावी लागते. काही वेळा या गाठीचे रूपांतर कॅन्सरमध्येसुद्धा होण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तींना हा आजर असतो. त्या व्यक्ती सुस्तावलेल्या असतात. कारण त्याच्या या ऊर्जा निर्माण होण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. गरोदर महिलांमध्ये ३ महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये आढळते.
थायरॉइडला दूर ठेवा फॅटयुक्त पदार्थ खाऊ नयेत. दररोज व्यायाम केल्याने चांगल्या पद्धतीने रक्ताभिसरण होते. वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते. थायरॉइडची चाचणी केल्यानंतर निदान सहज होते.
आजही आपल्याकडे या आजराचे प्रमाण अधिक आहे. याकरिता या आजाराची जनजगृती केली पाहिजे. या आजारांवर वेळेवर उपचार घेतले नाही, तर त्याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. हा आजार मोठ्या प्रमाणात महिलांना होत असतो. पुरुषाच्या तुलनेत दहा पटीने आजार महिलांमध्ये आढळून येतो. विशेष म्हणजे काही रक्तचाचण्या करून हा आजार आहे की नाही हे आपल्याला कळू शकते. या रक्ताच्या चाचण्या हल्ली ग्रामीण भागात स्वस्त दरात उपलब्ध आहेत. तसेच या आजारावरील उपचारपद्धती मोठ्या प्रमाणत विकसित झाली आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे आपल्याला शक्य झाले आहे, या आजाराचे निदान झाल्यावर आपणास काही औषधे द्यावी लागतात. ती रुग्णाला आयुष्यभरासाठी घ्यावी लागतात. भारतात ४ कोटी नागरिकांना थायरॉईड्शी निगडित आजार आहेत.डॉ. शशांक जोशी, अध्यक्ष, इंडियन थॉयराॅइड सोसायटी
या आजाराची कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हा आजार हळूहळू वाढत जातो. त्याचे दुष्परिणाम नंतरच्या काळात आपणास दिसून येतात. या आजराचे निदान करण्यासाठी टी ३, टी ४, टी एस एच या चाचण्या करण्याची गरज असते. या चाचण्यांचे निदान तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावे. जर थायरॉइडची लक्षणे असतील तर त्यासाठी काही गोळ्या डॉक्टर सुरू करतात. त्या वर्षभर घ्याव्या लागतात. काही वेळा गळ्याच्या भोवती गाठ असेल तर त्याची बायोप्सी करावी लागते. कारण काही वेळा त्या गाठीचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकते. पूर्वीसारखा आजार राहिला नाही, आता मिठामधून मोठ्या प्रमाणात आयोडीन मिळत असते. डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, वैद्यकशास्त्र विभाग, सेंट जॉर्जेस रुग्णालय