कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार सर्वात जास्त लहान मुलं आणि तरूणांमध्ये आढळून येतो. डोळ्यांच्या या आजाराची सर्वात मोठी कारणं म्हणजे मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही ही आहेत. या गॅझेट्सच्या अती वापरामुळे आजकाल कमी वयातच लहान मुलांच्या आणि तरूणांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. स्क्रीनकडे जास्त वेळ पाहत बसल्याने डोळ्यांचा हा आजार होतो. डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, जी लोकं रोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ कम्प्यूटर, मोबाईल, लॅपटॉपवर असतात. त्यांना कम्प्युटर विजन सिंड्रोम होण्याचा सर्वात जास्त धोका असतो.
काय आहे कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम
जेव्हा आपण कोणत्याही स्क्रिनकडे एकटक बघत असतो, त्यावेळी आपण डोळ्यांच्या पापण्या मिटणं विसरून जातो. त्यामुळे डोळ्यांमध्ये सारखं पाणी येण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर लॅपटॉपचा वापर करताना आपण व्यवस्थित बसलो नाही तर कंबर आणि मान दुखण्यास सुरुवात होते. तसेच तुम्हाला चष्मा आहे आणि तुम्ही तो घालत नसाल तरिदेखील तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे कम्प्यूटरवर काम करत असताना थोडा वेळ का होईना ब्रेक घेणं गरजेचं असतं. असं केल्यानं डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते. तसेच कम्प्यूटर स्क्रिनकडे एकटक बघण्यापेक्षा काही वेळाने का होईना डोळ्यांच्या पापण्या मिटत रहा.
कम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची लक्षणं
कम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची अनेक लक्षणं आहेत. जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ काम करता किंवा गरजेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर करत असाल. तर ही लक्षणं लक्षात घेऊन सावध व्हा.
- डोळे कोरडे होणं.- डोळे लाल होणं.- डोळ्यांमध्ये जळजळ होणं.- धुसर दिसणं.- एकापेक्षा जास्त गोष्टी दिसणं.- सतत डोकं दुखणं.- काम संपल्यानंतरही धुसर दिसणं.- डोळ्यांतून सतत पाणी येणं.- डोळे दुखणं किंवा डोळ्यांना सूज येणं.
असा करा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोमपासून बचाव
- जर तुम्हाला चष्मा असेल तर टाळाटाळ न करता त्याचा वापर करा.- चांगल्या प्रकाशातच कम्प्यूटरचा वापर करा.- कम्प्युटर अथवा लॅपटॉप योग्य अंतरावर ठेवून काम करा.- डोळ्यांत जास्त ड्राइनेस जाणवत असेल तर ल्यूब्रिकेशन असलेल्या आय-ड्रॉप्सचा वापर करा.- कम्प्युटरवर जास्त वेळ काम करत असाल तर एक-एक तासाने ब्रेक घ्या. डोळ्यांना आराम द्या.- एकाच स्थितीमध्ये खुप वेळ बसू नका.