मुंबई- तुमच्या ऑफिसमधील एखादी व्यक्ती सतत मोठ्याने शिंकते किंवा खोकते आणि इतरांकडे न पाहता पुन्हा कामाला लागते. कधीकधी काही लोक फोनमध्ये एखादा जोक वाचतात आणि मोठ्याने हसू लागतात आणि काही घडलेच नाही अशा अविर्भावात पुन्हा फोन किंवा कॉम्प्युटरकडे पाहू लागतात, असे लोक नेहमीच चर्चेचे विषय होतात. ऑफिसातील इतर लोक त्यांच्या वागण्यामुळे त्यांना टाळू लागतात. याचे कारण त्यांच्या या कृती किंवा गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. खोकला किंवा शिंक येणे हे नैसर्गिक असले तरी त्यानंतर इतरांना आवाजामुळे झालेल्या त्रासासाठी सॉरी, माफ करा असे म्हणणे अपेक्षित असते पण दुर्देवाने बहुतांश लोकांच्या गावीही ते नसते.
1) खोकणे, शिंकणे, ढेकर याबरोबर ऑफिसमध्ये वागताना आपण कामाच्या ठिकाणी आहोत याची जाणिव अनेकांना अनेकवेळेस करुन द्यावी लागते.
2)बहुतेक लोकांना ऑफिसमध्ये फिरताना इतरांच्या कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये डोकावण्याची वाईट सवय असते किंवा असे डोकावण्यामध्ये त्यांना काहीही गैर वाटत नाही. काहीकाही महाभाग तर दुसऱ्यांचे फोन हातामध्ये घेऊन त्यातील फिचर्स, अॅप्स तपासणे, एसएमएस वाचण्यापर्यंतही धाडस करतात. या पातळीचे वर्तन मात्र कार्यालयीन कामाचे नियम आणि एकूणच समाजात कसे वागावे यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे ठरते. आपण इतर काही लोकांबरोबर एकत्र काम करत आहोत तेव्हा इतरांना त्रास होणार नाही असं मी वागलं पाहिजे हे ते लोक विसरूनच जातात आणि मग घोटाळा होतो. अशा लोकांना त्यांच्या वागण्याची वेळीच जाणिव करून देणेही इतरांची जबाबदारी असते.
3)ऑफिसातील वातावरण खेळीमेळीचे असावे हे जितके खरे आहे तितके त्याला काही मर्यादा असतात, त्या ओळखाव्या लागतात. माइंड युअर ओन बिझनेस हे वाक्य कोणालाही उच्चारावे लागू नये.
4) तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करत आहात तेथे वेशभूषेचे काही नियम आहेत का हे पाहणे सर्वप्रथम गरजेचे आहे. जर तसे नियम असले तर त्यानुसार तुमचे कपडे असायला हवेत. जरी तुम्ही कोणतेही कपडे ऑफिसला घालून येऊ शकत असला तरी काय घालू नये याबद्दल अलिखित संकेत असतात ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. घामट, न धुतलेले कपडे तुमच्यासह इतरांनाही त्रासदायक ठरू शकतात. सिगारेट किंवा तंबाखू खाणारे लोक जरी सार्वजनिक ठिकाणी त्याचे व्यसन करत नसतील तरीही त्याचा वास त्यांच्या कपड्यांना येत असतो. कपड्यांना आणि अंगाला येणारा सिगारेटचा वास इतरांच्या डोकेदुखीचे कारण ठरू शकतो हे लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांना याचा त्रास होत असेल तर ते ताबडतोब बंद करावे लागेल किंवा तसा वास येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावीच लागेल.
5) कित्येकदा तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या व इतरही वेळेस अनेकांच्या तोंडातून घाणेरडा वास येत असतो त्यामुळे आपला त्रास इतरांना होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी. कपड्यांबरोबर तुमचे केस आणि नखेही योग्यप्रकारे कापलेली असली पाहिजेत. वैयक्तीक अस्वच्छता ही सार्वजनिक अस्वच्छतेत भर टाकत असते त्यामुळे काही वाईट सवयी जाणिवपूर्वक बदलाव्या लागतात. याबरोबरच खाण्या-पिण्याच्या सवयींबाबतही ऑफिसचे नियम असतात. तुम्ही जेथे जेवता- चहा, कॉफी पिता तेथील स्वच्छतेची जबाबदारीही तुमचीच असते.
6) ऑफिसमधील फ्रिज किंवा ओव्हनचा वापर काळजीपूर्वक केलाच पाहिजे त्याहून आपल्या शाकाहारी- मांसाहारी पदार्थांचा इतरांना त्रास होणार नाही याचेही भान जपले पाहिजे. पदार्थांचे वास फ्रिज-ओव्हनमध्ये बराचकाळ राहू शकतात. ऑफिसमधील स्वच्छतागृह आपल्याबरोबर इतरही लोक वापरणार असल्यामुळे सर्वांनीच योग्य त्या स्वच्छतेची जबाबदारी घ्यायला हवी.
7) आज काल बरेचसे कामाचे संभाषण व्हॉटसअॅप किंवा ग्रुप इमेलच्या माध्यमातून होत असते. अशावेळेस आपले संभाषण इतरही लोक वाचणार आहेत याचे भान तेव्हा असले पाहिजे. काही लोक ऑफिसच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर किंवा इमेलमध्ये इंग्लिशमध्ये लिहिण्याची धडपड करत हास्यास्पद संदेश पाठवतात, कधीकधी त्यातून गंभीर अर्थही निघू शकतात. अशावेळेस सरळ मराठीत किंवा तुम्हाला येत असणाऱ्या सोप्या भाषेत लिहावे किंवा प्रत्यक्ष भेटीत तुमचा निरोप द्यावा.
8) लक्षात ठेवा व्हॉटसअॅप हे केवळ व्हर्च्युअल संभाषणासाठी आणि निरोप देण्यासाठी केलेली सोय आहे, त्यावर तुम्ही काम करणे अपेक्षित नाही. काही महत्वाचे असेल तर ते प्रत्यक्ष भेटूनच सांगणे योग्य आहे. तुमच्यापेक्षा ज्युनियर व्यक्तीची चूक झाली असल्यास ती त्याच्या पर्सनल प्रोफाइलमध्ये जाऊन सांगितली पाहिजे किंवा योग्य भाषेत ती ग्रुपवर सांगितली पाहिजे. व्हॉटसअॅप हे कमीतकमी वेळेत भरपूर लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवत असले तरी ते काळजीपूर्वक वापरावे लागते. तुमची एखादी कॉमेंट किंवा चुकीचा इमोजी अर्थाचा अनर्थ करु शकतो.
9) तुमच्या फोनची रिंगटोन किंवा तिचा आवाजही इतरांसाठी त्रासदायक ठरत असतो. तुम्ही ऑफिसात रिंगटोन ऐकवण्यासाठी जात नाहीत, त्याचा खणखणीत आवाज फारच त्रास देणारा असतो. कधीकधी फोन जागेवर ठेवूनच लोक इकडेतिकडे फिरू लागतात आणि त्यांचा वाजणाऱ्या फोनचा आवाज इतरांना ऐेकावा लागतो, अशा सवयी ताबडतोब बदलाव्यात.
10) ऑफिस ही कामाची जागा असून तेथे कामालाच प्रथम प्राधान्य असले पाहिजे बऱ्याचदा विसरले जाते. कित्येकदा लोक आपल्या वैयक्तीक किंवा कामाशी संबंधित नसलेल्या बाबी इतरांना न विचारता सांगू लागतात किंवा इतरांनाही त्यांची परवानगी न घेता अशा विषयांवर चर्चेत ओढतात. त्यामुळे असे विषय टाळून कामालाच प्राधान्य दिले पाहिजे. लीव यूअर पर्सनल मॅटर्स अॅट डोअर हे सांगण्याची गरज येऊ नये. आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा इतर कोणीही दोन व्यक्ती संभाषण करत असताना त्यांना तोडून मध्येच बोलू नये किंवा दोन व्यक्ती बोलत असताना त्यांच्या मध्ये जाऊन उभे राहू नये.
गांभिर्याने पाहण्याच्या व तात्काळ बदलण्याच्या गोष्टी१) दुसऱ्याच्या कॉम्प्युटर किंवा फोनच्या स्क्रीनवर त्याच्या परवानगीविना डोकावणे२) परवानगीविना वैयक्तीक मुद्द्यांवर कार्यालयात चौकशी करणे३) आपले ड्रॉवर, टेबल अस्वच्छ असणे, फोनवर मोठ्याने बोलणे.४) खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर न करणे५) ऑफिसमध्ये कान, नाक, दात कोरणे