गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला आणि अपघात झाला! हे अपघातामागचं कारण आपण अनेकदा ऐकतो. प्रश्न पडतो की, आपल्याला झोप आली हे चालकाला कसं कळत नाही? क्षणात घात करणारी ‘मायक्रोस्लीप’ अशीच असते. ती आलीये हे कळतच नाही.
मायक्रोस्लीप म्हणजे काय? वाहन चालवताना येऊ शकणारी ही मायक्रोस्लीप अतिशय घातक असते. काही सेकंदासाठी डोळा लागणं म्हणजे मायक्रोस्लीप. हा डोळा इतका क्षणात लागतो की आपला डोळा लागतोय, हे कळतच नाही. ही मायक्रोस्लीप फक्त रात्रीच लागू शकते असं नाही, उलट ती मुख्यत्वे दिवसाच लागते. तुम्ही जागे असलेले वाटता, डोळे उघडेही असतात आणि झटक्यात ही मायक्रोस्लीप येऊ शकते. मेंदूला याबद्दल माहिती देण्याचीही उसंत मिळत नाही. अपुरी झोप झालेली असल्यास किंवा झोपेशी निगडित काही समस्या असल्यास काम करताना विशेषत: वाहन चालवताना, अवजड मशीनवर काम करताना अचानक मायक्रोस्लीप येण्याचा धोका असतो.
या मायक्रोस्लीपमुळे गाड्यांची समोरासमोर टक्कर होणं, गाडी रोडच्या खाली घसरणे असे गंभीर अपघात होऊ शकतात. म्हणूनच गाडी चालवण्याआधी आपण पूर्ण ‘अलर्ट’ आहोत ना याची खात्री करून घ्यावी. तंद्री लागत असल्यास आधी गाडी चालवणं थांबवावं. किंवा डोक्यात विचार गरगरत असतील, तर सावध व्हावं. गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी उभी करावी आणि व्यवस्थित आराम करावा. सोबत कोणी असल्यास आणि ते गाडी चालवण्यासाठी सुयोग्य वाटत असल्यास त्यांना गाडी चालवण्यास सांगावी.
मायक्रोस्लीपचा धोका टाळण्यासाठी..अवेळी, अचानक येऊ शकणारी ही घातक डुलकी अर्थात मायक्रोस्लीपचा धोका टाळायचा असल्यास झोपेकडे दुर्लक्ष करणं आधी थांबवावं. रोज आपली पुरेशी झोप होईल, याची काळजी घ्यावी. शांत आणि पुरेशी झोप झाली तरच आपण दिवसभर उत्साही आणि सजग राहू शकतो. ‘द नॅशनल स्लीप फाउंडेशन’ सांगते, प्रौढांना ७ ते ९ तासांची झोप आणि किशोर वयातील मुला-मुलींना त्यापेक्षा अधिक झोप आवश्यक आहे. रात्री झोप नीट लागण्यासाठी झोपण्याच्या तासभर आधी टीव्ही बंद करायला हवा. रात्रीच्या झोपेकडे गांभीर्यानं लक्ष दिल्यास दिवसाढवळ्या, काम करताना येणाऱ्या मायक्रोस्लीपचा धोका टाळता येतो.