Right way to drink water : पाणी आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्यातून आपल्या शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. शरीरातील पाणी जर कमी झालं तर अनेक गंभीर समस्या होतात. पाणी प्यायलेच नाही तर जीवही जातो. पण अनेकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. लोक पाणी पिताना अनेक चुका करतात. ज्याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतात.
पाणी पिताना काय चुका टाळाव्या आणि पिण्याच्या योग्य पद्धत काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्यांनी पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. जेणेकरून तुम्ही अनेक समस्या टाळू शकता.
योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी सांगितलं की, थंड आणि गरम पाणी मिक्स करून कधीच पिऊ नये. कधीही उभं राहून पाणी पिऊ नये.
तसेच पाणी कधी प्यावे याबाबत त्यांनी सांगितलं की, सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यावे. जेवणाच्या ३० मिनिटांआधी पाणी प्यावे आणि जेवण झाल्यावर ३० मिनिटांनी पाणी प्यावे. तसेच जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे. पाणी नेहमी खाली बसून शांतपणे आणि हळुवार प्यावे.
आयुर्वेदातही पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.