मुंबई : थोडासाही थकवा आला तर अंगदुखीसाठी आणि थकवा दूर करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि पेनकिलर गोळ्या खातो. पण याचे दुष्परिणाम माहित आहेत का? डोकेदुखी, ताप, अंगदुखी, मळमळ, उलटी यासारख्या लहान मोठ्या आजारांवर आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता पॅरासिटामॉल आणि पेनकिलर घेतो. मात्र, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.नुकताच एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या ११० रुग्णांवर हा अभ्यास केला आहे. चार दिवसांत पॅरासिटामॉलवर ठेवलेल्या गटामध्ये रक्तदाब लक्षणीयरीत्या वाढला होता, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता २० टक्क्यांनी वाढली होती. तीनपैकी एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे, तरी ब्रिटनमधील १० पैकी एका व्यक्तीला तीव्र वेदनांसाठी दररोज पॅरासिटामॉल लिहून दिले जाते. रुग्णांना पॅरासिटामॉल लिहून देण्यापूर्वी काळजी घ्यावी, अशी माहिती फिजिशियन डॉ. विकास बनसोडे यांनी दिली आहे. आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल याचं मिश्रण करून गोळी बनवली जाते. बहुतेक लोक या औषधांचे सेवन करतात. परंतु या औषधाचे जास्त सेवन केल्याने फुप्फुसाची समस्या उद्भवू शकते आणि दम्याचा त्रास देखील होऊ शकतो. याव्यतिरिक्त हाय बीपी, प्रोस्टेट आणि थायरॉईडसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
पॅरासिटामाॅलचा डोस किती असावापॅरासिटामॉलचा डोस व्यक्तीच्या वजनानुसार ठरतो. ५० किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीला ५०० मिलिग्रॅम औषधांचा डोस दिवसातून ३ वेळा दिला जातो. याचाच अर्थ दिवसभरात केवळ १५०० ते २००० मिलिग्रॅमचा डोस पुरेसा असतो. हा डोस किती दिवस घ्यायचा हे डॉक्टर रुग्णाची परिस्थिती पाहून ठरवितात.
सततच्या सेवनाने मेंदूवर परिणामवेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी वेदना नेमकी का होत आहे, आणि ते कारण कमी करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. दुखणे हे नैसर्गिक असून ते लक्षण आहे. वेदनाशामक गोळी हा केवळ तात्पुरता उपाय आहे. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि मेंदूवरही होतो.- डॉ. नूतन सावजी, मानसोपचारतज्ज्ञ
- ११० रुग्णांवर अभ्यास.- २० टक्क्यांनी वाढली हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता.- १० पैकी एका व्यक्तीला ब्रिटनमधील पॅरासिटामॉल दिली जाते.- वैद्यकीय सल्ल्याविना औषधांचे सेवन केल्यास गंभीर दुष्परिणाम शक्यता डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी व्यक्त केली.
औषध साक्षरता महत्त्वाचीडोस नियमित, रोज एकाच वेळी घेतल्यास औषधाची रक्तातील पातळी कायम राहून अपेक्षित सुपरिणाम होतो. म्हणून औषधांचे वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे व डोस शक्यतो विसरू नये. आधीचा डोस विसरला म्हणून पुढच्या डोसच्या वेळी डबल डोस घेऊ नये. अँटिबायॉटिक्सचा कोर्स पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अतिरंजित जाहिरातींना भुलून वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वत:वर औषधांचा प्रयोग करू नये.- डॉ. रामकृष्ण जाधव