डॉक्टर, झोपच येत नाही. एखादी झोपेची गोळी द्या ना, असं अनेकजण डॉक्टरांना सहज म्हणतात. काहीजण तर मेडिकल स्टोअरमध्ये जाऊनही अशा गोळ्यांबद्दल विचारणाही करतात. अशी औषधं स्वत:च्या मनानं अजिबात घेऊ नयेत, स्वत:वर प्रयोग करू नयेत. तसे झोपच येत नाही या आजाराकडे दुर्लक्षही करू नये. कधीतरी झोप न येणं ठीक, पण निद्रानाशाचा त्रास असेल, रात्र रात्र झोपच येत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.
झोप न येणं हा आजार काही असा नाही की घेतलं औषध झालं बरं. एकतर त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी लागेल. आहार-व्यायाम यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. ताण हलका होईल म्हणून काही थेरपी असतात त्याही घेता येतात आणि मग डॉक्टरांनी ठरवलं तर झोपेच्या गोळ्या, त्यांचा योग्य डोस, त्यांची मुदत, जोखीम, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम हे सारं पुढच्या उपचारांचा भाग आहे. अर्थात झोपेच्या गोळ्यांचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मला झोपच न येण्याचा विकार आहे, एवढंच डॉक्टरांना सांगून त्यांच्यापासून काही दडवू नका.
डॉक्टरांना काही गोष्टी स्पष्टच सांगायला हव्यात...१. झोप न येण्याचा त्रास कधीपासून आहे?२. यापूर्वी मानसिक आजाराची काही औषधं घेतली आहेत का?३. लिव्हर/किडनीचे काही आजार आहेत का?४. झोपेच्या गोळ्या पूर्वी घेत होतात, आता त्यांचा उपयोग होत नाही का?५. आपला झोपेचा पॅटर्न लहानपणापासून कसा आहे?
हे सारं डॉक्टरांशी मोकळेपणानं बोलायला हवं. त्यांनी ट्रिटमेंट सुचवली तरी ती ट्रिटमेंट किती दिवस असेल? त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स काय होऊ शकतात? गोळ्या गिळायच्या आहेत की चघळायच्या की स्प्रे आहे हे समजून घ्यायला हवं. डॉक्टर जर म्हणाले, गोळ्या न घेता, विविध थेरपी करून तुमची झोप परत येऊ शकते तर तसे करायला हवे. आपल्या झोपेशी स्वत:च खेळू नये. डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार महत्त्वाचे ठरतात. झोप न येणे या आजाराकडे अकारण दुर्लक्ष करू नये हे उत्तम. नाहीतर ते महागात पडू शकते.