मेंदूच्या कर्करोगाबाबत नव्याने करण्यात आलेला एक शोध समोर आला असून त्यानुसार मेंदूचा आकार मोठा असेल तर कर्करोगाचा धोका अधिक असतो, असे सांगण्यात आले आहे. मेंदूचा आकार मोठा याचा अर्थ मेंदूमध्ये जास्त पेशी आणि जितक्या जास्त पेशी असतील त्यात तितकं जास्त विभाजन होतं. याच विभाजनामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. हे विभाजन जर योग्य पद्धतीने झालं नाही तर व्यक्तींच्या डीएनएमध्ये स्थायी परिवर्तन होऊ शकतं आणि स्थायी परिवर्तन म्हणजे म्यूटेशन होऊ शकतं. याने कर्करोगाची शक्यता वाढते.
काय आहे याचं कारण?
नॉर्वीजन यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी करत असलेले इवेन होविग फ्लिनजेन म्हणाले की, 'वेगाने पसरणारा मेंदूचा कर्करोग फार क्वचित बघायला मिळतो. पण एकदा हा तुम्हाला झाला तर यातून जीव वाचण्याची शक्यता कमीच असते. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की, कर्करोग होण्यासाठी वेगवेगळ्या अंगांचा आकार एक महत्त्वपूर्ण कारण असतं. उदाहरण द्यायचं तर स्तनांचा आकार मोठा असलेल्या महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. आम्हाला जाणून घ्यायचं होतं की, मेंदूतील ट्यूमरबाबतही काय असंच होतं'.
पुरुषांमध्ये मेंदूच्या कर्करोगाची अधिक शक्यता
हजारो लोकांच्या ब्लड सॅम्पल आणि आरोग्यासंबंधी आकडेवारीचा वापर करुन एक अभ्यास करण्यात आला. अभ्यासकांनी मेंदूचा आकार मोजण्यासाठी एमआरआयचा वापर केला. या अभ्यासातून हेही आढळलं की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मेंदूच्या कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
फ्लिनजेन म्हणाले की, 'पुरुषांच्या मेंदूचा आकार हा महिलांच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. कारण पुरुषांचं शरीर सामान्यत: मोठं असतं. याचा अर्थ हा नाही की, पुरुष जास्त बुद्धिमान असतात. उलट मोठ्या शरीराला नियंत्रित करण्यासाठी मेंदूला अधिक पेशींची गरज पडते'.
या अभ्यासातून हेही आढळलं की, मेंदूचा आकार मोठा असलेल्या पुरुषांच्या तुलनेत मेंदूचा आकार मोठा असलेल्या महिलांना मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
ऑस्ट्रेलियातील संशोधकांचे मत
मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे ऑस्ट्रेलियातील संशोधनात दिसून आले आहे. वय व लिंग विशिष्ट पातळीवर १९८५८ पुरुष व १४२२२ महिलांच्या मेंदूची तपासणी ऑस्ट्रेलियात १९८२ ते २०१२ दरम्यान करण्यात आली होती, त्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. मोबाइलचा वापर व मेंदूचा कर्करोग यांचा काही संबंध नाही, असे नवीन अभ्यासात दिसून आले असून जास्त वापर असला तरीही गेल्या तीस वर्षांत मेंदूमध्ये गाठी आढळून येण्याचे प्रमाण वाढलेले नाही.
सिडनी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात १९८२-२०१२ दरम्यान रुग्णांची मेंदू तपासणी व १९८७ ते २०१२ दरम्यान मोबाइल फोनच्या वापराची माहिती यांची सांगड घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात मोबाइलचा वापर वयाच्या विशीपुढील लोकांमध्ये १९९३ मध्ये ९ टक्के होता, तो आता ९० टक्के आहे.