लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशात तरुणांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसत आहे. अनेक तरुण हृदयविकाराने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना आणि हृदयविकाराचा काही संबंध आहे का, यावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) अभ्यास करत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सविस्तर माहिती दिली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) गेल्या तीन-चार महिन्यांपासून हृदयविकाराचा झटका आणि कोविड यांच्यातील संबंधाचा अभ्यास करत आहे. येत्या दोन महिन्यांत तो पूर्ण होऊन निष्कर्ष हाती येतील, असे मांडविया म्हणाले.
सरकार तयार...
मांडविया म्हणाले की, कोरोना संक्रमणाच्या अलीकडील वाढीला तोंड देण्यासाठी सरकार तयार आहे. कोरोनाचा फैलाव होईल की नाही, हे सांगणे अशक्य आहे, परंतु उपप्रकार आले आहेत, ते आपत्ती निर्माण करण्याइतके धोकादायक नाहीत.
चौथी लाट नको म्हणून...
कोविड महामारीच्या संभाव्य चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री म्हणाले की, सतर्क राहण्याची गरज आहे. शेवटचे कोविड उत्परिवर्तन हे ओमायक्रॉनचे बीएफ.७ हा उपप्रकार होता आणि आता एक्सबीबी१.१६ उपप्रकारामुळे संक्रमण वाढले आहे, हा उपप्रकार फार धोकादायक नाही. आतापर्यंत आमच्या लसींनी सध्याच्या सर्व प्रकारांवर काम केले आहे.