Does Cold Water Makes You Fat : वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. यात मुख्यपणे चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल आणि शारीरिक हालचाल न करणे ही कारणे असतात. काही कारणे आनुवांशिक असतात. तर काही लोकांना असंही वाटतं की, थंड पाणी प्यायल्यानेही वजन वाढतं. पण खरंच थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. डायटिशिअन रंजती कौर यांनी एका इन्स्टा व्हिडीओच्या माध्यमातून याबाबत सांगितलं.
किती पाणी प्यावं?
आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचं असतं. भरपूर पाणी प्याल तरच आरोग्य चांगलं राहू शकतं. सामान्यपणे एक्सपर्ट सांगतात की, दिवसभरात कमीत कमी ४ लीटर पाणी प्यायला हवं. तसेच काही आयुर्वेद डॉक्टर सांगतात की, आपल्याला जेवढी तहान लागेल तेवढं पाणी प्यायले तरी पुरेसे आहे. ठरवून किंवा जबरदस्तीने पाणी पिऊ नका. जेव्हा तहान लागेल जेवढी तहान लागेल तेवढं पाणी प्यावं.
भरपूर पाणी प्यायल्याने वजन कंट्रोल राहतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. शरीर हायड्रेट राहतं. पोट भरलेलं राहतं, पचनक्रिया चांगली होते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पितात. पण अनेकांना थंड पाण्याबाबत प्रश्न पडतो. त्यांना वाटतं की, थंड पाण्याने वजन वाढतं. पण मुळात असं नाहीये.
डायटिशिअन रंजती कौर यांनी सांगितलं की, थंड पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म रेट वाढतो. जेव्हा थंड पाणी शरीरात जातं तेव्हा कार्ब्स आणि फॅट जाळण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. ज्यामुळे शरीरात तापमान कायम राहतं.
काय सांगतं सायन्स?
थंड पाण्याबाबत एक गैरसमज असतो की, याने वजन वाढतं. मात्र, जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अॅंड मेटाबॉलिज्मनुसार, थंड पाण्याचा वजन वाढण्यासोबत काहीच संबंध नाही. कारण पाण्यात मुळात काहीच कॅलरी नसतात. त्यामुळे याने वजन वाढत नाही. हे नक्की की, पाण्यामुळे इतर काही नुकसान होऊ शकतात. ते खालीलप्रमाणे...
- थंड पाणी प्यायल्याने पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, बद्धकोष्ठता होऊ शकते.
- घशात खवखव आणि सूज होऊ शकते.
- डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
- दातांमध्ये वेदना किंवा झिणझिण्या येऊ शकतात.
या समस्या तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही खूप जास्त थंड पाणी पिता. सामान्य थंड पाणी किंवा रूम टेम्परेचर पाणी प्यायल्याने काही नुकसान होत नाही.