Weight Loss Tips : आजकाल कमी वयातच वजन वाढणं, पोट बाहेर येणं अशा अनेक समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहेत. अशात वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. यातून काहींना फायदा होतो तर काहींना नाही. कारण अनेकांना वजन कमी करण्यासाठीच्या काही खास गोष्टी माहीत नसतात. केवळ एक्सरसाईज करून किंवा धावल्याने वजन कमी होत नसतं. आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
जेवणाआधीची तुमची एक छोटीशी सवय तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे याने आपल्या शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही. चला जाणून घेऊ काय आहे ट्रिक...
काय आहे उपाय?
अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट इलाना मुरस्टाइननुसार, जेवणाआधी साधारण एक ग्लास पाणी प्यायल्याने तुम्ही फिट राहू शकता. इलानानुसार काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जेवणाआधी पाणी प्यायल्याने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
खरंतर अनेकजण तहान लागण्याला भूकेच्या दृष्टीकोनातून बघतात. अशावेळी जेवण करताना पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं.
आयुर्वेदातही याचा उल्लेख
आयुर्वेदात जेवणाआधी आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे शरीरासाठी चांगलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, असे केल्याने व्यक्तीची पचनक्रिया कमजोर होऊ शकते. पण याजागी जेवण करताना मधे पाणी पिणे योग्य सांगण्यात आलं आहे.
आयुर्वेदानुसार, जेवण करताना मधून मधून एक-एक घोट पाणी प्यायला हवं. याने पदार्थ आणकी मुलायम होतो आणि ते पोटात पचन्यासाठीही सोपं जातं. सोबतच या पद्धतीने व्यक्ती जास्त जेवण करण्यापासूनही बचावतो. इतकेच नाही तर जास्त तेलकट किंवा मसालेदार भाज्या खाल्ल्या असतील तर यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांनाही रोखता येऊ शकतं.
कसं पाणी प्यावं?
फार जास्त थंड किंवा फार जास्त गरम पाणी पिणे टाळावे, शरीरासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी पिणे अधिक फायद्याचं असतं. याने तेल कमी केलं जातं आणि पदार्थ पचन्यासही मदत होते. इतकेच नाही तर याने फॅट बर्न होण्यासही मदत होते. जेवण केल्यावर लगेच ढसाढसा पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर साधारण अर्ध्या तासाने पाणी प्यावे.