बदलणारी जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे प्रत्येकानेच आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या अगदी लहानग्यांपासून तरूणांना आणि वद्धांनाही सतावणारी समस्या म्हणजे, हृदयविकार. सध्याचं सतत बदलणारं वातावरण आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे हृयविकाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
तसं पाहायला गेलं तर, हृदयविकार होण्याची अनेक कारणं असतात. परंतु अनेक रूग्णांमध्ये आढळून येणाऱ्या कारणांपैकी एक कारण म्हणजे, आहारामधील कमतरता आणि फिटनेसकडे केलेले दुर्लक्ष होय. आहारामध्ये जर व्हिटॅमिन आणि मिनरल्स योग्य प्रमाणात नसतील तर त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. शरीरातील इतर अवयवांपेक्षा हृदयावर या गोष्टींचा विपरित परिणाम लगेच दिसून येतो आणि हृदयाचे आरोग्य बिघडून हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
'हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ'च्या तज्ज्ञांनी यासंर्भात एक संशोधन केलं असून त्यामधून सिद्ध झालेल्या निष्कर्षांनुसार, ज्या व्यक्ती मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ईचे सेवन करतात. त्यांना हार्ट अटॅकचा धोका कमी असतो. जर एका दिवसाच्या आहारातून एखादी व्यक्ती 100 आययू व्हिटॅमिन ईचे सेवन करत असेल तर त्या व्यक्तीला हृदयाशी निगडीत आजारांचा धोका 38 टक्कांनी कमी असतो.
हार्ट अटॅकचा धोका त्या व्यक्तींमध्ये अधिक असतो, जे आपल्या फिटनेसकडे सतत दुर्लक्षं करत असतात. त्याचबरोबर ज्या व्यक्ती आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देत नाहीत त्यांनाही हृदविकाराचा धोका अधिक असतो. सध्या संपूर्ण जगभरामधील लोकांना व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जर तुम्ही हृदयाचे तारूण्य आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी सतत प्रयत्न करत असाल तर तुम्ही दररोजच्या आहारमध्ये व्हिटॅमिन-ईचा समावेश करू शकता. यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्याने व्हिटॅमिन-ईच्या सप्लीमेंट्सही घेऊ शकता. याव्यतिरिक्त आहारामध्ये व्हिटॅमिन-ईने परिपूर्ण असणाऱ्या काही पदार्थांचाही समावेश करू शकता.
व्हिटॅमिन-ईचा उत्तम स्त्रोत असणारे पदार्थ :
सामान्यतः व्हिटॅमिन-ई हिरव्या पालेभाज्या आणि फळांमध्ये मुबलक प्रमाणात असतं. याव्यतिरिक्त ड्रायफ्रुट्सही व्हिटॅमिन-ईचा उत्तम स्त्रोत समजले जातात. याशिवाय अंडी, सूर्याफूलाच्या बिया, रताळी, मोहरी, एवोकेडो, ब्रोकली, भोपळा, पॉपकॉर्न यातून व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच गहू, चणे, जव, खजूर, तांदूळ, क्रीम, लोणी, आणि फळांमधूनही व्हिटॅमिन-ई भरपूर मिळतं. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे योग्य आणि परिपूर्ण आहार मिळणे कठिण झालं आहे. अशावेळी जर आहाराबाबत आपण जागरूक राहिलो तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. वातावरणातील बदल यामुळे इतकं काही बदललं आहे की, आपण फिट दिसत असलो तरी आतून फिट नसतो. त्यामुळे अशाप्रकारचे शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स घेण्याकडे आपल्या बिझी शेड्युलमधून लक्ष दिलं पाहिजे.