जगभरात वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळी संशोधने सुरु असतात. याच संशोधनांपैकी एक संशोधन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या संशोधनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांना मलेरिया मुक्त होण्यास मदत होऊ शकते. कारण या संशोधनानुसार, लेब्राडोर प्रजातीचे श्वान मलेरिया पीडित रुग्णांची ओळख त्यांच्या कपड्यांवरुन आणि खासकरुन त्या व्यक्तीने रात्रभर वापरलेल्या मोज्यांचा वास घेऊन करुन शकतात.
हे संशोधन फार महत्त्वाचे मानले जात असले तरी यासाठी या श्वानांना प्रशिक्षित करावं लागणार आहे. हे लंडनच्या डरहम यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांचं मत आहे की, मलेरियाचे संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या त्वचेतून आणि श्वासातून एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी येते. या दुर्गंधीने श्वान या आजाराची ओळख पटवू शकतात. जेणेकरुन रुग्णांवर वेळेवर उपचार करता यावे.
याआधी २०१५ मध्ये इटलीच्या संशोधकांनी दावा केला होता की, जर्मन शेफर्ड प्रजातीचे श्वान यूरिन सॅम्पलचा वास घेऊन रुग्णाला प्रोटेस्ट कॅन्सर आहे की नाही याची माहिती मिळवण्यासाठी सक्षम आहेत. यात ९० टक्के यश मिळालं होतं. सध्याच्या हा रिसर्च अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन अॅन्ड हायजीनच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आला होता. या संशोधनात बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन सुद्धा सहभागी होतं.
७० टक्के निष्कर्ष बरोबर
या शोधादरम्यान गॅम्बिया स्कूलच्या मुलांमध्ये मलेरियाची लक्षणे दिसल्यावर त्यांना रात्री नायलॉनचे मोजे घालण्यास आणि रक्ताचे नमुने देण्यास सांगण्यात आले होते. एकूण १७५ नमुने घेतले गेले. १४५ मुलांच्या मोज्यांचेही नमुने घेतले गेले होते. हे नमुने तपासणीसाठी लंडनला पाठवण्यात आले. इथे प्रशिक्षित श्वानांनी मोज्यांचा वासाद्वारे ३० मुलांना मलेरिया असल्याचं स्पष्ट केलं होतं. या शोधातील ७० टक्के निष्कर्ष बरोबर निघाले.
डरहम यूनिव्हर्सिटी लंडनमधील डॉ. स्टीवन लिंडसे यांनी सांगितले की, 'मोज्यां व्यतिरीक्त रुग्णांच्या दुसऱ्याही वस्तूंचा समावेश शोधात करण्यात आलं होतं. आता हा प्रयोग वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मलेरियाने पीडित रुग्णांवरही केला जाणार आहे. अनेक देश हे मलेरियाला पूर्णपणे नष्ट करण्यात यशस्वी झाले आहेत. सध्याच श्रीलंका मलेरिया मुक्त देश झाला आहे'.
डॉ. स्टीवन पुढे म्हणाले की, 'काही लोक मलेरिया झाल्यावर फार लवकर आजारी पडतात. तेच काही असेही असतात ज्यांच्यामध्ये मलेरियाची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. जर एक हजार लोकांमधील एका व्यक्तीला मलेरियाचे संक्रमण झाले असेल तर त्याची ओळख पटवण्यासाठी सर्वच लोकांची रक्त तपासणी करावी लागेल. अशात सोपा उपाय शोधणं गरजेचं आहे.