- मयूर पठाडेतंबाकूनं आपल्या साऱ्यांचंच आयुष्य किती व्यापलेलं आहे तुम्हाला माहीत आहे? मग ते एकतर सिगारेटच्या स्वरुपात असेल नाहीतर तंबाकू, गुटखा, अथवा वेगवेगळ्या पुड्यांच्या स्वरुपात...अनेकांचा तर दिवसच तंबाकूशिवाय सुरू होत नाही आणि तंबाकूशिवाय संपत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ३१ मे हा दिवस जागतिक तंबाकूविरोधी दिन म्हणून जगभर पाळला जातो. यावर्षी या दिवसाची थिम आहे, ‘तंबाकू- विकासाची मारक’. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं सगळ्याच लोकांना तंबाकूपासून दूर राहण्याचा सल्ला तर दिला आहेच, पण विविध संस्था, संघटना, देशोदेशीचे सरकार यांनाही आवाहन केलं आहे की संस्थात्मक आणि संघटनात्मक पातळीवर तुम्हीही याबद्दल जनतेत जागृती करण्याचं काम करा. यासंदर्भातील काही वस्तुस्थितीही जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. दरवर्षी तंबाकूमुळे किती मृत्यू होतात माहीत आहे? विसाव्या शतकात निव्वळ तंबाकूमुळे तब्बल दहा कोटी लोकांचा अकाली मृत्यू झाला. तंबाकूचा वापर असाच सुरू राहिला तर एकविसाव्या शतकात तंबाकूनं जीव घेतलेल्या लोकांची संख्या असेल एक अब्ज!तंबाकूमुळे कॅन्सर होतो हे आता सगळ्यांनाच माहीत आहे, पण सिगारेटसारख्या व्यसनांमुळे जे धुम्रपान करीत नाहीत अशा लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे धुम्रपानाची घातक सवय जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढ्या लवकर सोडावी, असा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. धुम्रपान सोडण्याच्या 10 युक्त्या
१- धुम्रपान जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढ्या लवकर सोडा. त्यासाठी सर्वात जवळची एखादी चांगली तारीख शोधली तर आणखी उत्तम. मुलांचा, स्वत:चा किंवा बायकोचा वाढदिवस, एखादा सण, लग्नाची तारीख..२- धुम्रपान सोडल्यानंतरचे पहिले काही दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. निकोटिन विड्रॉवल सिम्टम्स तुम्हाला पुन्हा सिगारेटकडे आकर्षित करतील. त्याशिवाय तुम्हाला राहवणार नाही. पण याच काळात तुम्हाला कणखर राहणं आवश्यक आहे. हे पहिले काही आठवडे जर तुम्ही सिगारेटपासून दूर राहिलात, तर समजा सुटली तुमची सिगारेट!३- तुम्ही धुम्रपान सोडता आहात, हे तुमच्या घरातल्या आणि संपर्कातल्या साऱ्यांना सांगा. अशी इच्छा असणाऱ्यांनाही सोबत घ्या आणि त्यासाठी एकमेकांना सोबत करताना जबाबदारही धरा. ४- आपल्या भोवतीचं सारं वातावरणच ‘स्मोकिंग फ्री’ करून टाका. घरातील अशा साऱ्या वस्तू ताबडतोब नष्ट करा. स्मोकिंग झोनपासून आणि त्यासाठी तुम्हाला आग्रह करू शकणाऱ्या मित्रांपासून, लोकांपासून दूर तर राहाच, पण त्यांनाही सांगा, माझ्यासमोर धुम्रपान करीत जाऊ नका.५- आपल्या रोजच्या अनेक अॅक्टिविटीज धुम्रपानाशी निगडित असतात. उदाहरणार्थ पार्टीला गेलं, मित्रांबरोबर असलो, बाहेर जेवायला गेलो.. अशावेळी हमखास धुम्रपानाची लहर येते. या सवयींना अगोदर तोडा. ६- धुम्रपान सोडण्याच्या सुरुवातीच्या काळात अगदीच चैन पडत नाही. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही औषधोपचारांचाही उपयोग करता येईल.७- धुम्रपान सोडण्यासाठी योगा, ध्यानधारणा याचाही चांगला उपयोग होऊ शकतो. याशिवाय वेळच्या वेळी खाणं, झोपणं, पुरेशी झोप घेणं, भरपूर पाणी पिणं.. या गोष्टीही सहाय्यकारी ठरू शकतात.८- धुम्रपान सोडल्यानंतर सुरुवातीला डोकं दुखणं, अस्वस्थ वाटणं, वजन वाढणं, मुड चेंज होणं.. असल्या काही गोष्टी तुमच्या बाबत घडतील, पण त्यासाठी आपला दिवस अॅक्टिविटीजनी भरलेला ठेवा. जेणेकरुन धुम्रपानाची आठवण आली, तरीही तुम्ही त्याला दूर ठेऊ शकाल.९- सर्वात महत्त्वाची गोष्ट. तुमच्यापैकी अनेकांनी आजवर धुम्रपान सोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला असेल, पण आजवर तुमच्यापैकी अनेक जण त्यात पूर्णपणे यशस्वी ठरला नसाल, पण तरीही हा प्रयत्न सोडू नका. कारण लक्षात ठेवा, यशाकडे जाण्याची हीदेखील पहिली पायरी आहे.१०- लक्षात ठेवा, ज्यांचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि ज्यांच्यावर तुम्हीही तुमच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करता, त्यांच्यासाठी धुम्रपानाला सोडचिठ्ठी ही सर्वोत्तम भेट आहे. यापेक्षा दुसरी चांगली भेट कोणती असूच शकत नाही..